मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज): लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) वाशीम यांच्या पथकाने मेहकर येथे मोठी कारवाई करत सहाय्यक महसूल अधिकाऱ्याला २० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. या घटनेमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी कैलास भगवान मुरकुटे (वय ५४) हे उपविभागीय अधिकारी कार्यालय, मेहकर येथे कार्यरत होते. तक्रारदाराच्या नातेवाईकाच्या जमिनीवरील फेरफार रद्द करण्याच्या कामासाठी त्यांनी २० हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदाराने एसीबी वाशीमकडे तक्रार दाखल केल्यानंतर सापळा रचण्यात आला.
१६ एप्रिल रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयातील त्यांच्या कक्षातच लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने आरोपीस रंगेहात पकडले. या कारवाईत पोलीस उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी यांनी २४ जुलै रोजीच कर्मचाऱ्यांना नागरिकांशी सौजन्याने वागावे, कोणतीही अडवणूक करू नये तसेच कोणत्याही कामासाठी लाच किंवा मौल्यवान वस्तू स्वीकारू नयेत, असे स्पष्ट निर्देश देणारे परिपत्रक काढले होते. या पार्श्वभूमीवर घडलेली ही कारवाई विशेष लक्षवेधी ठरत आहे.
एसीबीकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, कोणताही शासकीय अधिकारी लाच मागत असल्यास तत्काळ संबंधित एसीबी कार्यालयाशी संपर्क साधावा.













