सिंदखेड राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज):तालुक्यातील खैरखेड येथे एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून विजेच्या धक्क्याने २७ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. ही घटना ४ मार्च रोजी सकाळच्या सुमारास घडली. अरविंद गंगाधर वाघ असे मृत युवकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अरविंद वाघ हे सकाळी सुमारे साडेदहा वाजताच्या दरम्यान आपल्या घरासमोरील गुरांच्या गोठ्यावरील टिन पत्रे दुरुस्त करण्याचे काम करत होते. त्यावेळी अचानक आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे टिन पत्राचा तुकडा उडून जवळून जाणाऱ्या विद्युत वाहिनीच्या संपर्कात आला. यामुळे त्यांना तीव्र विजेचा धक्का बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, ग्रामस्थांनी व्यक्त केलेल्या माहितीनुसार संबंधित ११ केव्ही वीजवाहिनी ही घरांच्या अत्यंत जवळून गेली असून तारांमध्ये झोल असल्याची समस्या होती. याबाबत अरविंद वाघ यांनी यापूर्वी अनेकदा विद्युत विभागाकडे तोंडी तक्रारी केल्या होत्या. मात्र, प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्यानेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
घटनेची माहिती मिळताच किनगाव राजा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला असून दुपारच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. वृत्त लिहीपर्यंत या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.या घटनेमुळे खैरखेड गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.













