Advertisement Advertisement

“ताटातले वाटीत, वाटीतले ताटात; चिखलीत भाजप-शिवसेनेची मिलीभगत?” – राहुल बोंद्रे यांचा आरोप!

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज):चिखली तालुक्यात भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेमध्ये आडून-आडून संगनमत सुरू असल्याचा गंभीर आरोप जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी केला आहे. “ताटातले वाटीत आणि वाटीतले ताटात” असा प्रकार सध्या सुरू असल्याची टीका त्यांनी केली.

शनिवार, ४ एप्रिल रोजी बुलढाणा येथील जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड हे चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले यांना बहिण म्हणतात, तर दुसरीकडे सार्वजनिकरित्या विरोधक असल्याचे दाखवतात. यामुळे दोन्ही पक्षांमध्ये आडून सहकार्य सुरू असल्याचा संशय बळावतो.

बोंद्रे पुढे म्हणाले की, भाजपवर नाराज असलेल्या कार्यकर्त्यांना काँग्रेसमध्ये येऊ न देता त्यांना शिवसेनेत वळवले जात आहे. कारण भाजपला माहित आहे की, काँग्रेसच त्यांना ठामपणे टक्कर देऊ शकते. त्यामुळे महायुतीतील घटक पक्षांना जवळ करून भाजप आपली राजकीय रणनीती राबवत आहे.

रेणुका देवी यात्रेनिमित्त आमदार संजय गायकवाड चिखलीत आले होते. त्यावेळी ते अचानक घरी आल्याने पाहुणचार केला, असे सांगत बोंद्रे म्हणाले की, “चिखलीचे सुसंस्कृत राजकारण जपले आहे, याचा अभिमान आहे. मात्र सध्याच्या काळात राजकारणाचा स्तर खालावला आहे.”

भाजपच्या कार्यपद्धतीवर टीका करताना त्यांनी सांगितले की, चर्चा घडवून आणणे, दबाव टाकणे आणि पक्षप्रवेशासाठी भाग पाडणे, ही भाजपची देशभरातील पॉलिसी आहे. मात्र चिखलीत काँग्रेसचे पदाधिकारी या दबावाला बळी पडणार नाहीत, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

“भाजप काँग्रेसला घाबरते”!

नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने भाजपइतकेच १३ नगरसेवक निवडून आणले. तसेच नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेस उमेदवारालाही मोठा पाठिंबा मिळाला. त्यामुळे चिखलीत वाढत्या काँग्रेस प्रभावामुळे भाजपच्या गोटात घबराट पसरली असल्याचा दावा बोंद्रे यांनी केला.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!