चिखली(बुलडाणा कव्हरेज न्युज)शहरात विक्री होणाऱ्या काही ब्रेडमध्ये घातक रासायनिक पदार्थांचा वापर होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पोटॅशियम ब्रोमेट, पोटॅशियम आयोडेट यांसारख्या रसायनांचा वापर केल्याने कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी माहिती समोर आली आहे.
अन्न व औषध प्रशासनाने पोटॅशियम ब्रोमेटचा वापर करण्यास बंदी घातली असतानाही काही ठिकाणी नियम धाब्यावर बसवून ब्रेड तयार केला जात असल्याचे सांगितले जात आहे. हे रसायन पीठ फुगवण्यासाठी व ब्रेड अधिक मऊ व आकर्षक दिसण्यासाठी वापरले जाते. मात्र त्याचा दीर्घकालीन परिणाम आरोग्यावर गंभीर होऊ शकतो.
विशेष म्हणजे शहरातील काही बेकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ब्रेडचे उत्पादन केले जाते. काही ठिकाणी बनवलेला ब्रेड शहरातील दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी पाठवला जातो. त्यामुळे नागरिकांनी ब्रेड खरेदी करताना काळजी घेण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अशा रसायनांचा सातत्याने सेवन केल्यास पोटाचे विकार, कॅन्सरचा धोका तसेच इतर आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.













