बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज):जिल्ह्यात विविध कारणांमुळे महिला बेपत्ता होण्याच्या घटना वाढत असताना त्यांचा शोध घेण्यासाठी बुलढाणा जिल्हा पोलीस दलाने विशेष मोहीम राबवली असून त्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. वर्ष २०२५ मध्ये नोंद झालेल्या ९४९ महिला बेपत्ता प्रकरणांपैकी तब्बल ८२९ महिलांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. म्हणजेच जवळपास ८७ टक्के महिलांचा शोध घेण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.
जिल्ह्यात हरविलेल्या महिलांचा शोध घेण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. बुलढाणा येथील पोलीस नियंत्रण कक्षात “महिला मिसिंग डेस्क” सुरू करण्यात आले असून जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये “मिसिंग सेल” स्थापन करण्यात आले आहेत. या यंत्रणांमधून सातत्याने समन्वय साधून महिलांचा शोध घेण्याचे काम केले जात आहे.
महिला मिसिंग डेस्क आणि मिसिंग सेल यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे २०२५ मधील बहुसंख्य प्रकरणांमध्ये यश मिळाले आहे. दरम्यान, सन २०२१ पासून आजपर्यंत २८४ महिला बेपत्ता प्रकरणे अद्याप प्रलंबित असून त्यांचा शोध घेण्यासाठी बुलढाणा जिल्हा पोलीस दलाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.











