मलगी (बुलडाणा कव्हरेज न्यूज) –चिखली तालुक्यातील मलगी गावात काल २३ जून रात्री दोन वेगवेगळ्या घरांमध्ये घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीमुळे गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,पहिली घटना रात्री सुमारे एकच्या सुमारास निवृत्ती भुसारी यांच्या घरी घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या परसातून तीन ते चार हजार रुपये तर घरातील कपाटात ठेवलेले सुमारे सहा ते सात हजार रुपये चोरून नेले.

यानंतर चोरटे पुढे दुसऱ्या घराकडे वळले. पहाटे सुमारे तीन ते साडेतीन वाजेच्या दरम्यान प्रल्हाद पवार यांच्या घरी चोरट्यांनी प्रवेश केला. त्यावेळी घरात दोन वयोवृद्ध आजी झोपलेल्या होत्या. चोरट्यांनी त्यांच्याजवळील गळ्यातील सोन्याचे पोत काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आजी जागी झाल्या, त्यामुळे एक चोरटा घाबरून गेला आणि दुसऱ्याने त्यांच्या तोंडावर हात दाबून ठेवला. मग दुसऱ्याने चोरट्याने घरातील एक पेटी उचलून नेली आणि शेजारच्या शेतात नेऊन फोडली.
मात्र त्या पेटीत केवळ साड्या आणि कपडे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. घटनास्थळी पोलिस यंत्रणा पोहचली आहे, व पुढील तपास सुरू केला आहे…