अमडापूर (बुलडाणा कव्हरेज न्यूज): “या लॅबच्या माध्यमातून शिक्षण आणि तंत्रज्ञान यांचा परिसस्पर्श होऊन अमडापूरच्या विद्यार्थ्यांचे आयुष्य सोन्यासारखे उजळावे, अशी प्रार्थना मी आमच्या गावच्या बल्लाळदेवीकडे करते,” असे भावनिक उद्गार चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी व्यक्त केले. अमडापूर येथील जिल्हा परिषद कन्या मराठी शाळेत तब्बल ५० लाख रुपयांच्या संगणक लॅबचे उद्घाटन आणि नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आयोजित प्रवेशोत्सवप्रसंगी त्या बोलत होत्या.
EXCLUSIVE: भरदिवसा चाकूने गळा चिरून युवकाची निर्घृण हत्या; एक आरोपी अटकेत, एक फरार
या संगणक लॅबच्या यशामागे गावकऱ्यांचे आणि शिक्षकांचे सामूहिक योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले. “सुरुवातीला जेव्हा लॅबची मागणी झाली, तेव्हा नियमानुसार आवश्यक जागा उपलब्ध नव्हती. मात्र, शिक्षकांनी व शाळा व्यवस्थापन समितीने दोन वर्ग खोल्यांचे एकत्रीकरण करून जागेची अडचण सोडवली,” असे त्यांनी सांगितले. यानंतर वर्गखोल्यांची कमतरता भासू लागली असताना, गरीब आणि अल्प उत्पन्न असलेल्या पालकांनीही आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी लोकवर्गणी उभारून नव्या वर्गखोल्या उपलब्ध करून दिल्या. “ही बाब केवळ प्रेरणादायी नाही, तर खऱ्या अर्थाने सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव करून देणारी आहे. अशा पालकांच्या श्रमातून उभा राहिलेला निधी कोणत्याही शासकीय अनुदानापेक्षा मोठा आहे,” असेही त्या म्हणाल्या.



शिक्षक जाधव सर आणि शिक्षिका शितोळे मॅडम यांच्या अभ्यासू आणि तंत्रज्ञानस्नेही कार्यशैलीमुळे शाळेचा शैक्षणिक दर्जा उल्लेखनीयरीत्या वाढला आहे. या शाळेतील विद्यार्थी संख्याही मागील काही वर्षांत ३५ वरून थेट १०० पर्यंत वाढल्याने, या प्रगतिशील वाटचालीबद्दल आमदार महाले यांनी शाळा, शिक्षक, ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समितीचे विशेष कौतुक केले.
या प्रसंगी जिल्हा परिषदेचे गटविकास अधिकारी गजानन पोफळे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद येंडोले, गटशिक्षणाधिकारी रमेश पाटील, गट समन्वयक प्रवीण वायाळ, सरपंच सौ. वैशालीताई गवई, माजी सरपंच ललिताताई माळोदे, भाजपा अमडापूर मंडळ अध्यक्ष अमोल साठे, शहराध्यक्ष प्रशांत पाखरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अरुण जाधव, उपाध्यक्ष मिताली जाधव, प्रवीण सेठ खंडेलवाल, गजानन चोपडे, प्रसाद देशमुख, बबनराव राऊत, योगेश जुमडे, रमेश देडे, राम देशमुख, प्रकाश निकाळजे, अक्षय आदबाणे, अजमत टेलर, इमरान खान, रवी काळे, नितीन जाधव, प्रकाश खराडे, गजानन जाधव, दीपक झाडे, प्रवीण माळोदे, गणेश माळोदे, पवन दायजे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्याम जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन शेडगे मॅडम यांनी मानले.