Advertisement Advertisement

मेंढ्यांचा सौदा करायला गेले अन् लुटारूंच्या जाळ्यात अडकले! जंगलात चाकूचा धाक, विवस्त्र करून व्हिडीओ व्हायरलची धमकी; तेलंगणातील व्यापाऱ्याला २ लाख २१ हजारांचा गंडा!

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : व्यवसायाच्या व्यवहाराचे आमिष दाखवून विश्वास संपादन करणे तेलंगणातील मेंढी-बकरी व्यापाऱ्याला चांगलेच महागात पडले. मेंढ्या खरेदी-विक्रीचा व्यवहार करून देण्याच्या बहाण्याने व्यापाऱ्यासह त्याच्या साथीदाराला निर्जन जंगल परिसरात नेण्यात आले. तेथे चाकूचा धाक दाखवून मारहाण करीत रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि मोबाईल लुटण्यात आला. एवढ्यावरच न थांबता दोघांना विवस्त्र करून व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत त्यांच्या बँक खात्यांमधून जबरदस्तीने ऑनलाइन पैसेही वळते करण्यात आले. या धक्कादायक प्रकारात एकूण २ लाख २१ हजार रुपयांची लूट झाल्याची तक्रार असून, सहा अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तेलंगणातील नस्कल येथील मेंढी-बकरी व्यापारी सिरा भानू हे त्यांचे मेहुणे प्रोहित आणि चालक प्रवीण यांच्यासोबत मेंढ्या खरेदीसाठी बाहेर पडले होते. २३ ऑक्टोबरच्या रात्री नविपेट येथे त्यांची एका अनोळखी व्यक्तीशी भेट झाली. या व्यक्तीने मलकापूर येथे मेंढ्यांचा चांगला व्यवहार करून देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर त्यांना लोकेशन पाठवण्यात आले. २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ते मलकापुरातील एका राममंदिराजवळ पोहोचले. तेथे मास्क घालून पल्सर दुचाकीवर आलेल्या व्यक्तीने भानू आणि प्रवीण यांना सोबत घेतले आणि दोन ते तीन किलोमीटरवरील निर्जन परिसरात नेले.

तेथे आधीपासून दबा धरून बसलेल्या साथीदारांच्या मदतीने दोघांना मारहाण करण्यात आली. चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील ८१ हजार रुपये रोख, चार ग्रॅम वजनाची अंगठी, १५ ग्रॅमची सोनसाखळी आणि मोबाईल हिसकावून घेण्यात आला. त्यानंतर दोघांना विवस्त्र करून त्यांचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. या धमकीच्या जोरावर यूपीआयचा पिन सांगण्यास भाग पाडून भानू यांच्या खात्यातून ९० हजार, तर प्रोहित यांच्या खात्यातून ५० हजार रुपये ऑनलाइन हस्तांतरित करून घेण्यात आले.

या प्रकरणात अर्पण किशोर अग्रवाल यांच्या नावे नमूद असलेल्या यूपीआय खात्यावर भानू यांच्या खात्यातून ९० हजार आणि प्रोहित यांच्या खात्यातून ३० हजार, असे एकूण १ लाख २० हजार रुपये जमा झाले. तसेच ज्योती दीपक ठोसर यांच्या नावे असलेल्या यूपीआय खात्यावर प्रोहित यांच्या खात्यातून २० हजार रुपये पाठवण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. सायबर तक्रार दाखल केल्यानंतर १ लाख ४६ हजार ९८६ रुपये संबंधित बँक खात्यांमध्ये रोखण्यात आल्याचा संदेश मिळाल्याचेही तक्रारदाराने सांगितले.

या घटनेप्रकरणी तेलंगणातील निजामपेठ पोलिसांनी ३ नोव्हेंबर रोजी झिरो एफआयआर नोंदवला. त्यानंतर हे प्रकरण पुढील तपासासाठी मलकापूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. व्यवसायाच्या व्यवहाराचे आमिष दाखवून परराज्यातील व्यापाऱ्याला निर्जनस्थळी नेऊन लुटल्याच्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सहा अज्ञात आरोपींचा शोध घेण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!