Advertisement Advertisement

जंगलात दोन बिबट्यांचा मृत्यू; अस्तित्वाच्या लढाईत दोघांचाही अंत! चालठाणा वनक्षेत्रातील कक्ष क्रमांक ६२३ मधील घटना; आपापसातील झुंजीत मृत्यू झाल्याचा वनविभागाचा प्राथमिक अंदाज….

जळगाव जामोद (बुलडाणा कव्हरेज न्युज) : जंगलात आपल्या अस्तित्वासाठी सुरू असलेल्या संघर्षात दोन बिबट्यांचा मृत्यू झाल्याची घटना जळगाव जामोद तालुक्यातील चालठाणा वनक्षेत्रात उघडकीस आली. नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक ६२३ मध्ये २१ नोव्हेंबर रोजी हे दोन्ही बिबट मृतावस्थेत आढळून आले. प्राथमिक शवविच्छेदन अहवालानुसार दोन्ही बिबट्यांचा मृत्यू आपापसातील झुंजीत झाल्याचा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. या घटनेमुळे वनविभागात खळबळ उडाली आहे.

चालठाणा नियतक्षेत्राच्या वनरक्षक आर.के. राऊत या वनमजुरासह २१ नोव्हेंबर रोजी जंगलात गस्तीवर असताना कक्ष क्रमांक ६२३ मध्ये दोन बिबट मृतावस्थेत आढळून आले. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत वनगुन्ह्याची नोंद करण्यात आली. सहायक वनसंरक्षक, पशुधन विकास अधिकारी आणि वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दोन्ही बिबट्यांचे शवविच्छेदन करण्यात आले.

शवविच्छेदनादरम्यान प्राथमिक निरीक्षणात दोन्ही बिबट्यांचा मृत्यू आपापसातील झुंजीमुळे झाल्याचे समोर आले आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी आवश्यक नमुने संकलित करण्यात आले असून ते अमरावती येथील न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. दोन्ही बिबट अनुसूची-१ मध्ये समाविष्ट असल्याने वनविभागाकडून या प्रकरणाची शास्त्रोक्त पद्धतीने तपासणी करण्यात येत आहे.

मुख्य वनसंरक्षक ज्योती बॅनर्जी, जिल्हा उपवनसंरक्षक जमीर शेख आणि सहायक वनसंरक्षक विजय कटके यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी नीलेश काळे पुढील तपास करीत आहेत. या कारवाईत वनपाल बडगुजर, वनरक्षक राऊत, कडवकर, हागोणे, अब्दुल सादिक यांच्यासह वनकर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. प्रमाणित कार्यपद्धतीनुसार दोन्ही बिबट्यांच्या मृतदेहांची विल्हेवाट लावण्यात आली.

दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि खात्रीशीर माहितीशिवाय सोशल मीडियावर कोणतीही माहिती प्रसारित न करण्याचे आवाहन केले आहे. जंगलालगतच्या शेतात जाताना खबरदारी घ्यावी. वन्यप्राणी दिसल्यास त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न न करता तातडीने वनविभागाला माहिती द्यावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!