Advertisement Advertisement

टाकरखेडला चोरट्यांनी घर फोडलं, सोनं-चांदी लुटून नेलं; पण पोलिसांच्या कागदावर मात्र चोरीची किंमत फक्त…

मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज): घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी लोखंडी कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना १० नोव्हेंबर रोजी मध्यरात्री टाकरखेड येथे उघडकीस आली. या चोरीत बाळाच्या सोन्याच्या बाळ्या आणि चांदीचे बाजूबंद असा मुद्देमाल चोरीला गेला. मात्र, या चोरीप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी दाखविलेल्या मुद्देमालाच्या किमतीवरून आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बाजारभावानुसार जवळपास ५० हजार रुपये किमतीचे दागिने चोरीला गेले असताना पोलिसांच्या नोंदीत मात्र केवळ २ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल दाखविण्यात आला आहे.

नांदुरा तालुक्यातील टाकरखेड येथील रहिवासी आणि सध्या मलकापूर येथे वास्तव्यास असलेले अमोलसिंग मोहनसिंग राजपूत यांनी याप्रकरणी बोराखेडी पोलिसांत तक्रार दिली आहे. १० नोव्हेंबर रोजी रात्री जेवण आटोपल्यानंतर ते साडेअकराच्या सुमारास टाकरखेड येथील आपल्या घराच्या वरील खोलीत झोपले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर लोखंडी कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने चोरून पोबारा केला. मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास ही चोरी उघडकीस आली.

चोरट्यांनी लहान बाळाच्या कानातील एक ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन जोड बाळ्या, ज्यांची किंमत तक्रारीत २ हजार रुपये नमूद करण्यात आली आहे, तसेच २०० ग्रॅम वजनाचे चांदीचे दोन बाजूबंद, ज्यांची किंमत २०० रुपये दाखविण्यात आली आहे, असा एकूण २ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल चोरल्याची नोंद पोलिसांनी केली आहे.

एक ग्रॅम सोन्याची किंमत २ हजार; २०० ग्रॅम चांदी अवघ्या २०० रुपयांत!

या चोरीप्रकरणातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या नोंदविण्यात आलेल्या किमती. सध्याच्या बाजारभावाचा अंदाज घेतल्यास एक ग्रॅम सोन्याची किंमत सुमारे १४ हजार रुपये, तर २०० ग्रॅम चांदीची किंमत अंदाजे ३६ हजार रुपये होते. म्हणजेच चोरीला गेलेल्या दागिन्यांची बाजारभावानुसार किंमत जवळपास ५० हजार रुपयांच्या घरात जाते. असे असताना पोलिसांच्या नोंदीत केवळ २ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल दाखविण्यात आल्याने ही तफावत नेमकी कशामुळे, असा सवाल उपस्थित होत आहे.

या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. पोलीस हेडकॉन्स्टेबल सुपडासिंग चव्हाण आणि पोलीस कॉन्स्टेबल सदानंद हाडे तपास करीत आहेत. चोरी गेलेल्या दागिन्यांच्या किमतीची योग्य पडताळणी करून नोंदीतील तफावत स्पष्ट केली जाणार का, याकडे आता लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!