Advertisement Advertisement

‘५ हजार रुपये देऊन उपकार केल्याची भाषा करू नका; आम्ही भिकारी नाही! तुमची पाच हजारांची मदत तुम्हालाच ठेवा…!”रविकांत तुपकरांचा नवनाथ बन यांच्यावर घणाघाती पलटवार; म्हणाले, नवनाथ बन म्हणजे, खोट बोल पण रेटून बोल…त्यांचा सगळा उपद्व्याप”एमएलसी” साठी…

पुणे (बुलडाणा कव्हरेज न्युज): शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी देण्यात येणाऱ्या पाच हजार रुपयांच्या मदतीवरून सरकारचा उदोउदो करणाऱ्या भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या टीकेला शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आक्रमक प्रत्युत्तर दिले आहे. “शेतकऱ्यांना दिलेले पाच हजार रुपये काय तुम्ही स्वतःचे शेत विकून दिले आहेत का? असा सवाल करीत हे जनतेच्या कराचे पैसे आहेत. त्यामुळे उपकार केल्यासारखी भाषा करू नका. आम्ही भिकारी नाही, तुमची पाच हजारांची मदत तुम्हालाच ठेवा,” अशा शब्दांत तुपकरांनी सरकारच्या भूमिकेवर आणि नवनाथ बन यांच्या वक्तव्यावर जोरदार प्रतिहल्ला चढवला आहे. त्याआधी नवनाथ बन यांनी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या सरकारवरील टिकेला प्रत्युत्तर देत,”आमच्याच सरकारने शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत दिल्याचा दावा करीत, तुपकरांना सरकारला सहकार्य करण्याचे आवाहन केले होते.

तुपकर म्हणाले की, महाराष्ट्रातील जनता कर भरते आणि त्याच पैशातून सरकार शेतकऱ्यांना मदत करते. त्यामुळे मदतीचे निर्णय घेताना सरकारने शेतकऱ्यांवर उपकार केल्याचा आव आणू नये. एकीकडे दुष्काळ आणि नैसर्गिक संकटांनी शेतकरी उद्ध्वस्त होत असताना दुसरीकडे सरकारकडे इतर खर्चांसाठी कोट्यवधी रुपये उपलब्ध असतात. मग शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची वेळ आली की पैशांचा प्रश्न का उपस्थित केला जातो, असा सवाल त्यांनी केला.

‘व्हीआयपींच्या गाड्यांसाठी पैसा कुठून येतो?’

सरकारच्या खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना तुपकरांनी व्हीआयपींसाठी गाड्या खरेदी करण्याच्या मुद्द्यावरूनही सरकारला धारेवर धरले. व्हीआयपींच्या गाड्यांसाठी साडेबारा कोटी रुपये खर्च करण्याची तयारी असते, तर संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देताना अडचणी का येतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “दुष्काळाचा सामना करण्याचा ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलेला नाही. मग आमदारांचे, मंत्र्यांचे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे वेतन किंवा सरकारी दौऱ्यांवरील खर्च कमी करण्याचा विचार का केला जात नाही?” असा सवाल करत तुपकरांनी सरकारच्या प्राधान्यक्रमावर टीका केली. केवळ मागील सरकारने काय केले, याचा दाखला देऊन सध्याच्या सरकारला जबाबदारी झटकता येणार नाही, असेही ते म्हणाले.

‘नागपूर-मुंबईत नाही, शेताच्या बांधावर अधिवेशन घ्या!’

तुपकरांनी हिवाळी अधिवेशनाच्या आयोजनावरूनही आपली भूमिका पुन्हा स्पष्ट केली. शेतकरी संकटात असताना नागपूर किंवा मुंबईत सरकारी खर्चाने अधिवेशन घेण्याऐवजी थेट शेताच्या बांधावर अधिवेशन घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

“आम्ही वर्षानुवर्षे शेतात राबतो, शेतात झोपतो. पाठीमधून घामाच्या धारा वाहेपर्यंत कष्ट करतो. मंत्र्यांनी आणि आमदारांनीही एकदा शेतात येऊन शेतकऱ्यांचे जीवन अनुभवावे. घरचे डबे आणा, स्वतःच्या खर्चाने या आणि शेताच्या बांधावर अधिवेशन घ्या. या अधिवेशनावर सरकारच्या तिजोरीतून एकही रुपया खर्च होऊ देऊ नका,” असे आव्हान तुपकरांनी दिले.

‘कुंभमेळा, शक्तिपीठ, बंदरासाठी पैसा; मग शेतकऱ्यांसाठी का नाही?’

सरकारच्या विविध प्रकल्पांवरील खर्चाचा संदर्भ देत तुपकरांनी शेतकरी मदतीच्या मुद्द्यावरून सरकारला लक्ष्य केले. कुंभमेळा, शक्तिपीठ महामार्ग, वाढवण बंदर आणि सरकारी वाहन खरेदी यांसारख्या बाबींसाठी निधी उपलब्ध होऊ शकतो, तर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आर्थिक अडचणींचा मुद्दा का पुढे केला जातो, असा सवाल त्यांनी केला.

‘एमएलसी मिळवण्यासाठी सुरू आहे सगळा खटाटोप!’

नवनाथ बन यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना तुपकरांनी त्यांच्या राजकीय हेतूंवरही प्रश्न उपस्थित केला. “नवनाथ बन, हे सगळं तुमचं एमएलसी मिळवण्यासाठी सुरू आहे,” असा आरोप करत त्यांनी भाजपच्या प्रवक्त्यांच्या भूमिकेवर निशाणा साधला. सरकारने मागील सरकारच्या चुका दाखवून स्वतःच्या जबाबदारीतून सुटका करून घेऊ नये, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.“त्यांनी गाय मारली म्हणून तुम्हाला वासरू मारण्याची परवानगी मिळत नाही,” अशा शब्दांत तुपकरांनी सरकारच्या कारभारावर टीका केली. मागील सरकारने काही चुकीचे केले असेल, तर त्याच चुका पुढे चालू ठेवण्याचे समर्थन होऊ शकत नाही असे तुपकर म्हणाले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारला घेरताना तुपकरांनी इशारा दिला की, आरोप-प्रत्यारोप करून शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. दुष्काळ, आर्थिक संकट आणि शेतमालाला योग्य भाव मिळण्याच्या प्रश्नांवर ठोस निर्णय घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Latest Stories

Leave a Comment

WhatsApp Join Group!