Advertisement Advertisement

मायलेकी अचानक गायब! ३ वर्षांच्या चिमुकलीला घेऊन २२ वर्षीय विवाहिता बेपत्ता! आई-वडिलांची चिंता वाढली, नातेवाईकांकडं शोधाशोध सुरू! अंढेरा पोलिसांत तक्रार दाखल….

चिखली(बुलडाणा कव्हरेज न्युज) : चिखली तालुक्यातील मेरा खुर्द येथून २२ वर्षीय विवाहिता आपल्या अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीला सोबत घेऊन बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. २३ ऑक्टोबर रोजी रात्री घराबाहेर पडलेली ही महिला मुलीसह परत न आल्याने कुटुंबीय चिंतेत असून, सर्वत्र शोध घेऊनही मायलेकीचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मेरा खुर्द येथील गजानन कचरू गवई यांची मुलगी आशा मंगेश बोरकर (वय २२) हिचा विवाह सावरगाव येथील मंगेश बोरकर याच्यासोबत झाला आहे. तिला निधी नावाची तीन वर्षांची मुलगी आहे. पती-पत्नीमध्ये आपसात पटत नसल्याने आशा ही काही काळापासून आपल्या माहेरी मेरा खुर्द येथे आई-वडिलांसोबत राहत होती.

दरम्यान, २३ ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आशा ही बाहेर जाऊन येते, असे सांगून आपल्या तीन वर्षांच्या मुलीला सोबत घेऊन घराबाहेर पडली. मात्र, बराच वेळ होऊनही ती घरी परतली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी तिचा नातेवाईकांसह परिसरात सर्वत्र शोध घेतला; परंतु आशा आणि तिची मुलगी निधी कुठेही आढळून आल्या नाहीत.

बेपत्ता महिलेचे वर्णन : आशा मंगेश बोरकर हिचा रंग गोरा, बांधा सडपातळ, उंची अंदाजे पाच फूट सहा इंच असून, केस काळे व लांब आहेत. बेपत्ता होताना तिने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला होता, तर पायात काळ्या रंगाची चप्पल होती. तिच्यासोबत असलेल्या निधी हिचा रंग गोरा असून, तिने पांढऱ्या रंगाचा टॉप आणि काळ्या रंगाची पॅन्ट घातली होती.

या प्रकरणी आशाचे वडील गजानन कचरुबा गवई (वय ४२, रा. मेरा खुर्द) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंढेरा पोलिसांनी २४ ऑक्टोबर रोजी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १४०(३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!