बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : भारतीय हवामान विभागाने वर्तविलेल्या पाच दिवसीय हवामान अंदाजानुसार बुलढाणा जिल्ह्यात पुढील पाच दिवस कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. या काळात आकाश मुख्यतः निरभ्र ते अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. एल निनो सदृश परिस्थिती आणि कमाल तापमानातील संभाव्य बदल लक्षात घेता, शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांचे नियोजन करताना उपलब्ध सिंचन स्रोतांची खात्री करूनच पेरणी करावी, असा कृषी सल्ला जिल्हा कृषी हवामान केंद्राने दिला आहे.
चालू महिन्यात मान्सूनोत्तर किंवा अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता कमी असल्याने शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा विचार करून रब्बी पिकांच्या पेरणीचे नियोजन करावे. पाण्याची संभाव्य टंचाई लक्षात घेता, लवकर परिपक्व होणाऱ्या आणि पाण्याचा ताण सहन करू शकणाऱ्या वाणांची निवड करणे फायदेशीर ठरणार आहे. पावसाच्या भरवशावर पेरणी करण्याऐवजी उपलब्ध ओलावा आणि सिंचनाची परिस्थिती लक्षात घेऊनच निर्णय घेण्याचे आवाहन कृषी हवामान केंद्राने केले आहे.
करडी पेरणीसाठी ऑक्टोबरअखेरपर्यंत संधी…..
ओलिताखालील करडी पिकाची पेरणी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत करता येऊ शकते. करडीच्या बियाण्याची उगवण चांगली आणि लवकर होण्यासाठी पेरणीपूर्वी बियाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र, पेरणी करताना जमिनीतील ओलावा आणि उपलब्ध सिंचनाची खात्री करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर पाण्याची बचत करण्यासाठी फळझाडांच्या सुकलेल्या, रोगट आणि अतिरिक्त फांद्या छाटून टाकाव्यात. यामुळे फळझाडांची पाण्याची गरज कमी होऊन उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करता येईल.
जनावरांच्या आहाराकडेही लक्ष द्या!
दुसरीकडे, जनावरांना केवळ वाळलेला चारा दिल्याने त्यांच्या पोषणाच्या सर्व गरजा पूर्ण होत नाहीत. त्यामुळे जनावरांचे वय, वजन, दूध उत्पादन आणि शारीरिक अवस्था लक्षात घेऊन आहाराचे नियोजन करावे. गरजेनुसार संतुलित पशुखाद्य, खनिज मिश्रण आणि मिठाचा समावेश आहारात करावा, असेही कृषी हवामान केंद्राने स्पष्ट केले आहे.
ग्रामीण कृषी मौसम सेवा अंतर्गत जिल्हा कृषी हवामान केंद्र आणि कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा यांच्या वतीने हा कृषी सल्ला देण्यात आला आहे. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पाणी व्यवस्थापन, योग्य वाणांची निवड, वेळेवर पेरणी आणि पशुधनाच्या पोषणाकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.














