चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : सततची नापिकी, वाढते कर्ज आणि आर्थिक अडचणींमुळे शेलोडी येथील ४० वर्षीय शेतकरी राजेंद्र बजरंग रक्ताडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. १७ ऑक्टोबर रोजी राहत्या घरी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली. या घटनेमुळे शेलोडी परिसरात हळहळ व्यक्त होत असून, रक्ताडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
राजेंद्र रक्ताडे यांच्याकडे अवघी तीन एकर शेती होती. याच शेतीच्या भरवशावर ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मात्र, शेतीत सातत्याने होणारी नापिकी आणि खासगी सावकारांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्याचे वाढते ओझे यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती. यंदाच्या हंगामातही निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसल्याने त्यांच्यासमोरील संकट अधिकच गंभीर झाले होते.
आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी राजेंद्र रक्ताडे यांनी शेलसूर येथील बँकेत नवीन पीककर्ज मिळावे म्हणून आवश्यक कागदपत्रे जमा केली होती. कर्ज मिळण्याच्या प्रतीक्षेत असतानाच शेतीतील प्रतिकूल परिस्थिती आणि वाढत्या आर्थिक विवंचनेमुळे ते अडचणीत सापडले होते. या परिस्थितीतून निर्माण झालेल्या नैराश्यातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.
राजेंद्र रक्ताडे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन लहान मुली आणि भाऊ असा परिवार आहे. कुटुंबाचा आधार असलेल्या कर्त्या पुरुषाच्या निधनाने रक्ताडे कुटुंब उघड्यावर पडले असून, दोन लहान मुलींच्या भविष्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांच्या वाढत्या आर्थिक अडचणी आणि नापिकीचे संकट पुन्हा एकदा या घटनेच्या निमित्ताने ऐरणीवर आले आहे.












