बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाच्या युवक संघटनेत बुलढाणा जिल्ह्यातील दोन महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या मान्यतेने अॅड. योगेश नाईक यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी, तर सतीश पाटील भुतेकर यांची बुलढाणा दक्षिण जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या नियुक्त्यांमुळे जिल्ह्यातील युवक संघटनेला नवी ताकद मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
रामनगर, ता. देऊळगाव राजा येथील अॅड. योगेश नाईक यांच्यावर प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर इसरूळ, ता. चिखली येथील सतीश पाटील भुतेकर यांची बुलढाणा दक्षिण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भुतेकर हे इसरूळ गावाचे लोकनियुक्त सरपंच असून, चिखली तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही ते कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांच्या राजकीय व सामाजिक अनुभवाचा पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी उपयोग होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या हस्ते दोन्ही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना अधिकृत नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे, विधिमंडळ पक्षनेते आमदार जयंत पाटील, आमदार रोहित पवार, डॉ. राजेंद्र शिंगणे, नरेश शेळके यांच्यासह इतर वरिष्ठ नेत्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे, तसेच पक्षाची ध्येय-धोरणे तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविणे, हे या नियुक्त्यांमागील प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगण्यात आले.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी युवकांचे प्रश्न, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या आणि स्थानिक पातळीवरील जनतेच्या अडचणी प्रभावीपणे मांडून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केली आहे. आगामी काळात युवकांची संघटनात्मक बांधणी मजबूत करणे, नव्या कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडणे आणि पक्षाचे कार्य गावागावांत पोहोचविण्याचे आव्हान या पदाधिकाऱ्यांसमोर असणार आहे. दरम्यान, दोन्ही नियुक्त्यांबद्दल पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह कार्यकर्त्यांनी अॅड. योगेश नाईक आणि सतीश पाटील भुतेकर यांचे अभिनंदन करून पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.















