खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील महावीर नगर परिसरात ३५ वर्षीय युवकाचा राहत्या घरी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २४ नोव्हेंबर रोजी रात्री घडली. नारायण श्रीराम भगत (वय ३५) असे मृत युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नारायण भगत हे पत्नी रुपाली, आई तुळसाबाई आणि दोन मुलींसह महावीर नगरात राहत होते. त्यांना दारूचे व्यसन असल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची संपूर्ण जबाबदारी पत्नी रुपाली यांच्यावर होती. त्या मजुरी करून कुटुंबाचा गाडा ओढत होत्या.
२४ नोव्हेंबरच्या रात्री रुपाली यांना जाग आली असता नारायण हे घरातील छताच्या अँगलला बांधलेल्या दोरीला लटकलेल्या अवस्थेत आढळले. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर शेजाऱ्यांनी तातडीने धाव घेत त्यांना खाली उतरवले. त्यानंतर खासगी रुग्णवाहिकेने सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी मृताचे चुलत भाऊ संदीप समाधान भगत (वय ४०, रा. आनंद नगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी नोंद घेत पुढील तपास सुरू केला आहे.













