Advertisement Advertisement

विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल क्रुझर उलटली; ११ विद्यार्थी जखमी!देऊळगाव महीजवळ थरारक अपघात; तिघांची प्रकृती गंभीर, मद्यप्राशन करून चालक गाडी चालवत असल्याचा पालकांचा आरोप; चालक पोलिसांच्या ताब्यात

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): शाळकरी चिमुकल्यांना घेऊन जाणाऱ्या खासगी क्रुझरचा भीषण अपघात झाल्याने देऊळगाव मही परिसरात एकच खळबळ उडाली. बुधवार, २५ नोव्हेंबर रोजी सकाळी संत गाडगेबाबा प्राथमिक शाळेची विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी क्रुझर रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली. या अपघातात तीन विद्यार्थी गंभीर जखमी झाले, तर आठ विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. मात्र, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत शाळा व्यवस्थापनाच्या भूमिकेवर पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

देऊळगाव मही येथील संत गाडगेबाबा प्राथमिक शाळेत वाकी खुर्द आणि वाकी बुद्रुक येथील विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांची ने-आण एमएच-२१-बीएफ-०६३५ क्रमांकाच्या खासगी क्रुझरमधून केली जाते. बुधवारी सकाळी चालक सूरज पैठणकर हा वाकी येथून विद्यार्थ्यांना घेऊन शाळेकडे येत असताना वाहनावरील नियंत्रण सुटले आणि क्रुझर रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. संबंधित चालकाने मद्यप्राशन करून वाहन चालविल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला आहे.

या अपघातात चौथीतील विद्यार्थी सिद्धेश्वर ज्ञानेश्वर पवार, दुसरीतील विद्यार्थिनी रिया कैलास भोसले आणि आर्यन अमोल जिणे हे गंभीर जखमी झाले. तर प्रवेश हिरो पवार, अखिल पनवेल भोसले, रशा पनवेल भोसले, आरोग्य मुन्ना पवार, प्रज्ञा प्रवीण जायभाये, प्रियंका प्रवीण जायभाये, आरुषी विश्वनाथ जायभाये, रुद्र आकाश वाकोडे, अनुश्री भगवान जायभाये आणि आर्यन विकास वाकोडे यांच्यासह अन्य विद्यार्थ्यांना दुखापत झाली. जखमींना प्रथम देऊळगाव मही येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमी विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी जालना येथे हलविण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच पालकांनी देऊळगाव मही पोलीस चौकीत मोठी गर्दी केली. चालकावर कठोर कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली. याप्रकरणी पवनेर मल्हारी भोसले (रा. वाकी) यांनी फिर्याद दिली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन ठोसरे आणि पोलीस निरीक्षक ब्रह्म गिरी यांनी घटनास्थळी भेट दिली. चालकाची वैद्यकीय तपासणी करून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक ब्रह्म गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली कलीम देशमुख पुढील तपास करीत आहेत.

आधीही दोनदा अपघात झाल्याचा पालकांचा आरोप!

पालक प्रवीण जायभाये यांनी केलेल्या आरोपानुसार, संबंधित चालक यापूर्वीही मद्यप्राशन करून विद्यार्थ्यांची वाहतूक करीत होता. यापूर्वी दोन वेळा संबंधित वाहन रस्त्याखाली गेल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यावेळी संतप्त पालकांनी मुलांना शाळेत पाठविण्यास नकार दिला होता. मात्र, शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीची जबाबदारी घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर पालकांनी पुन्हा मुलांना शाळेत पाठविण्यास सुरुवात केली. आता पुन्हा अपघात झाल्याने पालकांचा संताप अनावर झाला आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची?

या घटनेने शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शाळेत जाणारी चिमुकली मुले सुरक्षित घरी परततील, याची जबाबदारी नेमकी कोणाची? वाहनचालकांची नियमित वैद्यकीय तपासणी, मद्यपान चाचणी, वाहनांची तांत्रिक तपासणी आणि शाळा व्यवस्थापनाची जबाबदारी निश्चित करण्याची गरज या घटनेतून अधोरेखित झाली आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी संबंधित प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची मागणी पालकांकडून होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!