बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : सकाळी लवकर उठून यात्रेला सुरुवात… दिवसभर गावागावांत सभा, शेतकऱ्यांच्या बांधावर भेटी… अनेक ठिकाणी रात्री अकरा वाजेपर्यंत चालणाऱ्या सभा… त्यानंतर सहकाऱ्यांसोबत जेवण आणि पुन्हा रात्री उशिरापर्यंत शेतकऱ्यांशी संवाद! ना पंचतारांकित हॉटेलची व्यवस्था, ना मोठा लवाजमा, ना निवासाची विशेष बडदास्त… गावात मिळेल त्या व्यवस्थेत अतिशय साध्या पद्धतीने मुक्काम करायचा आणि सकाळी उठून पुन्हा शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी संघर्षाला सुरुवात करायची! गेल्या अकरा दिवसांपासून शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा असा दिनक्रम सुरू आहे. दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आणि भूमिहीनांच्या न्याय्य हक्कांसाठी १४ नोव्हेंबर रोजी मलकापूर येथून सुरू झालेल्या दुष्काळ संघर्ष यात्रेला दिवसागणिक वाढता प्रतिसाद मिळत आहे. काल, २४ नोव्हेंबर रोजी यात्रेचा अकरावा दिवसही सिंदखेडराजा तालुक्यात तुफान गाजला. जऊळका, दुसरबीड, राहेरी, ताडशिवणी, देवखेड, रुम्हणा, सोयंदेव, चांगेफळ, धानोरा, बुट्टा, वर्दडी, सोनोशी, जांभोरा या गावांतून मार्गक्रमण करत यात्रा किनगाव राजा येथे पोहोचली. रात्री झालेल्या दुष्काळ एल्गार सभेला शेतकरी, शेतमजूर, महिला आणि तरुणांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. रात्री उशिरापर्यंत सभांना होणारी गर्दी या यात्रेचे वैशिष्ट्य ठरत आहे.
या यात्रेतील तुपकरांचा मुक्काम आणि त्यानंतरचा दिनक्रमही लक्षवेधी आहे. दिवसभर गावागावांत फिरून अनेक ठिकाणी रात्री अकरा वाजेपर्यंत सभा चालतात. त्यामुळे रात्री अकरानंतरच तुपकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना जेवणासाठी वेळ मिळतो. ज्या गावात मुक्काम असतो, तेथील स्थानिक कार्यकर्ते आपुलकीने भोजनाची व्यवस्था करतात. सर्व सहकाऱ्यांसोबत जेवण केल्यानंतरही तुपकरांचा दिवस संपत नाही. उलट मुक्कामाच्या ठिकाणी शेतकऱ्यांशी निवांत संवाद साधण्यास सुरुवात होते. गावागाड्यातील शेतकरी आपल्या अडचणी घेऊन भेटायला येतात. कुणी कर्जाची व्यथा मांडतो, कुणी पीकविम्याची अडचण सांगतो, तर कुणी शासकीय कार्यालयात रखडलेले काम घेऊन येतो. दिवसभराच्या धावपळीनंतरही तुपकर प्रत्येक शेतकऱ्याचे म्हणणे ऐकून घेतात. एखादी अडचण संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलून सुटण्यासारखी असेल, तर तिथूनच अधिकाऱ्यांना फोन लावून ती मार्गी लावण्याचा प्रयत्न करतात. रात्री उशिरापर्यंत चालणारा हा संवाद शेतकऱ्यांना आपल्या अडचणी मोकळेपणाने मांडण्याची संधी देत आहे. दिवसभर व्यासपीठावरून हजारो शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारे तुपकर रात्री मुक्कामाच्या ठिकाणी एखाद्या सामान्य शेतकऱ्याची वैयक्तिक अडचणही तितक्याच आस्थेने ऐकून घेत असल्याचे चित्र यात्रेदरम्यान पाहायला मिळत आहे.
काल रात्री रविकांत तुपकर यांनी उमरद येथील नरसिंह मंदिरात मुक्काम केला. निवासासाठी कोणतीही आलिशान व्यवस्था नाही, विशेष सोयीसुविधांचा आग्रह नाही. गावकऱ्यांनी प्रेमाने केलेल्या व्यवस्थेतच तुपकर आणि त्यांचे सहकारी मुक्काम करतात. मुक्कामाच्या ठिकाणी कार्यकर्त्यांची लगबग, शेतकऱ्यांच्या गाठीभेटी आणि त्यांच्या प्रश्नांवर चर्चा सुरू असते. दिवसभर शेतकऱ्यांच्या बांधावर आणि रात्री गावकऱ्यांच्या सहवासात असा या यात्रेचा प्रवास सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून मिळेल तेवढी विश्रांती घ्यायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा नव्या गावाच्या दिशेने निघायचे, हा दिनक्रम अव्याहतपणे सुरू आहे. दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांच्या जगण्याशी थेट जोडलेली ही यात्रा असल्याने गावकऱ्यांशी निर्माण होणारे आपुलकीचे नातेही या संघर्षाची जमेची बाजू ठरत आहे.
हेक्टरी एक लाख रुपयांची दुष्काळी मदत, सरसकट कर्जमुक्ती, नव्याने पीककर्ज, हक्काचा पीकविमा, सिबिलच्या अटीतून दिलासा, मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या सक्तीच्या वसुलीला स्थगिती, भूमिहीन व शेतमजुरांना आर्थिक मदत आणि सोयाबीन-कापसाला योग्य भाव या मागण्यांसाठी तुपकरांचा संघर्ष सुरू आहे. घाटाखालील तालुक्यांपासून घाटावरील गावांपर्यंत यात्रेला मिळणारा प्रतिसाद दिवसागणिक वाढत आहे. ४ डिसेंबर रोजी बुलढाण्यात होणाऱ्या एल्गार महामोर्चाचा दिवस जसजसा जवळ येत आहे, तसतशी गावागावांत मोर्चाची तयारीही जोर धरत आहे. दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या मनातील असंतोषाला या यात्रेच्या माध्यमातून संघटित स्वरूप मिळत असल्याचे चित्र आहे. दिवसभर सभा, रात्री शेतकऱ्यांशी संवाद आणि मिळेल त्या व्यवस्थेत मुक्काम करत सुरू असलेल्या या संघर्षाची आता जिल्ह्याच्या सीमा ओलांडून राज्यभर चर्चा होत आहे. या पार्श्वभूमीवर ४ डिसेंबरचा एल्गार महामोर्चा किती व्यापक स्वरूप धारण करतो, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.














