Advertisement Advertisement

बुलढाणा जिल्ह्यात दुष्काळाचं सावट! १,४२० गावांची पैसेवारी ५० पैशांखाली! जिल्ह्याची सरासरी पैसेवारी अवघी ४३; बुलढाणा तालुका सर्वात खालच्या क्रमांकावर, जळगाव जामोदची स्थिती तुलनेने…

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): यंदाच्या खरीप हंगामात पावसाच्या लहरीपणाचा आणि पावसातील दीर्घ खंडाचा फटका शेतीला बसत असल्याचे चित्र समोर आले आहे. सन २०२६-२७ च्या खरीप हंगामासाठी जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या नजर अंदाज पिकेवारीनुसार बुलढाणा जिल्ह्यातील सर्वच्या सर्व १ हजार ४२० गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी नोंदविण्यात आली आहे. जिल्ह्याची सरासरी पैसेवारी अवघी ४३ असल्याने खरीप पिकांच्या स्थितीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

प्रशासनाच्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील १ हजार ४२० गावांचा या नजर अंदाज पैसेवारीत समावेश आहे. तालुकानिहाय गावांची संख्या पाहता बुलढाणा तालुक्यात ९८, चिखली १४४, देऊळगाव राजा ६४, मेहकर १६१, लोणार ९१, सिंदखेड राजा ११४, मलकापूर ७३, मोताळा १२०, नांदुरा ११२, खामगाव १४६, शेगाव ७३, जळगाव जामोद ११९ आणि संग्रामपूर तालुक्यातील १०५ गावांचा समावेश आहे.

तालुकानिहाय सरासरी पैसेवारीमध्ये जळगाव जामोद तालुका ४८ पैशांसह आघाडीवर आहे. तर बुलढाणा तालुक्याची पैसेवारी सर्वात कमी म्हणजे अवघी ३१ पैसे नोंदविण्यात आली आहे. याशिवाय चिखली तालुका ३८, खामगाव ४२, देऊळगाव राजा व सिंदखेड राजा प्रत्येकी ४३, मेहकर ४५, तर लोणार, मलकापूर, मोताळा, शेगाव आणि संग्रामपूर या पाच तालुक्यांची पैसेवारी प्रत्येकी ४६ नोंदविण्यात आली आहे. नांदुरा तालुक्याची पैसेवारी ४३ आहे.

जिल्ह्यातील एकाही गावाची नजर अंदाज पैसेवारी ५० पैशांपर्यंत पोहोचलेली नसल्याने खरीप हंगामातील पीक परिस्थितीचे गांभीर्य अधोरेखित झाले आहे. विशेषतः बुलढाणा तालुक्याची सर्वात कमी पैसेवारी आणि जिल्ह्याची ४३ पैशांची सरासरी लक्षवेधी ठरत आहे. आता या नजर अंदाज पैसेवारीनंतर प्रशासनाकडून पुढील कार्यवाही काय होते आणि शेतकऱ्यांना कोणत्या उपाययोजनांचा लाभ मिळतो, याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!