खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : लग्नासाठी मुलगी शोधणाऱ्या मध्यप्रदेशातील एका कुटुंबाला दलालांच्या माध्यमातून चांगलाच गंडा घातल्याचा प्रकार खामगाव शहरातील महाकाल चौक परिसरात उघडकीस आला आहे. घरातच तरुणाचा विवाह उरकून नवरदेवाच्या कुटुंबाकडून तब्बल १ लाख ५ हजार रुपये घेतल्यानंतर नवरीला न पाठविता नवरदेवाला एकट्यालाच रवाना करण्यात आले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील गवल बडूद, पश्चिम निमाड येथील बरले कुटुंबातील आकाश या तरुणाचे लग्न जुळविण्यासाठी मध्यप्रदेशातील दिनेश बरले याने त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे मुलगी असल्याचे सांगून त्याने आकाश व त्याच्या कुटुंबीयांना ११ सप्टेंबर रोजी खामगाव येथे आणले. त्यानंतर महाकाल चौकातील उषा सकळकळे तसेच अकोला येथील सोहम उर्फ राजेश वर्मा आणि हरी इंगळे यांच्या माध्यमातून उषाच्या बहिणीची मुलगी प्रज्ञा हिच्यासोबत आकाशचा विवाह घरातच हार घालून उरकण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या विवाहासाठी आकाशचे वडील शांतीलाल बरले यांच्याकडून १ लाख ५ हजार रुपये घेण्याचे ठरले होते. विवाह झाल्यानंतर पैशांची मागणी करण्यात आली. त्यावेळी पैसे गाडीत असून गाडी बसस्थानकावर असल्याचे शांतीलाल यांनी सांगितले. त्यानंतर विवाह जुळविणारे संबंधित व्यक्ती बसस्थानकाकडे गेले. शेगाव रोडवर काही अंतर पुढे गेल्यानंतर शांतीलाल यांच्याकडून ठरलेली रक्कम घेण्यात आली. त्यानंतर नवरदेव आणि नवरीला पाठवून देतो, असे सांगून संबंधित तिघेजण तेथून निघून गेले.
मात्र, पैसे घेतल्यानंतरही नवरीला नवरदेवासोबत पाठविण्यात आले नाही. आकाशला एकट्यालाच रवाना करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. १६ सप्टेंबरपर्यंत नवरी येण्याची वाट पाहूनही काहीच हालचाल न झाल्याने अखेर शांतीलाल बरले यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या तक्रारीवरून उषा सकळकळे (रा. महाकाल चौक, खामगाव), सोहम उर्फ राजेश वर्मा (रा. अकोला), हरी इंगळे (रा. अकोला) आणि प्रज्ञा गायगोळ (रा. खामगाव) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३१९(२) व ३(५) अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे ठाणेदार मंदार पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ प्रकाश वसतकार करीत आहेत.












