चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): बुलढाणा जिल्ह्यात पावसाने मोठा खंड दिल्याने खरीप हंगामातील पिके धोक्यात आली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, मका आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचा दावा शेतकरी संघटना व क्रांतीकारी शेतकरी संघटनेने केला आहे. सुमारे ५० दिवसांपासून पावसाचा खंड असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, अद्याप जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून नुकसानभरपाई देण्याबाबत ठोस निर्णय झालेला नसल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी चिखली शहरात ‘भीक मांगो’ आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनादरम्यान शेतकरी संघटना व क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चिखली शहरात फिरून नागरिक, व्यापारी तसेच किराणा दुकानदारांकडून छोट्या रकमेच्या स्वरूपात पैसे तसेच काजू-बदाम जमा केले. काही किराणा व्यावसायिकांनी काजू-बदाम देऊन आंदोलनाला पाठिंबा दिला, तर काहींनी आर्थिक मदत केली. जमा झालेल्या पैशातूनही काजू-बदाम खरेदी करण्यात आले.
“शेतकरी अडचणीत असताना आढावा बैठका घेऊन काजू-बदाम खाण्यापेक्षा प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची परिस्थिती पाहा,” असा उपरोधिक सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला. पालकमंत्र्यांनी जिल्ह्यात येऊन शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष पाहणी करावी, उसणवारी करून, कर्ज काढून आणि मोठ्या खर्चाने शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र पावसाने दडी मारल्याने हाताशी आलेली पिके संकटात सापडली आहेत. त्यामुळे केवळ बैठका आणि आश्वासनांऐवजी पर्जन्यमान व प्रत्यक्ष पीक परिस्थितीच्या आधारे तातडीने सर्वेक्षण करून संपूर्ण बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी करण्यात आली.यासोबतच शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई, हेक्टरी एक लाख रुपये मदत आणि संपूर्ण शेतकरी कर्जमाफी करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. जमा करण्यात आलेले पैसे व काजू-बदाम चिखली तहसीलदार यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री यांच्याकडे पाठविण्यात आले. शेतकऱ्यांच्या व्यथा शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या आंदोलनात देविदास कणखर, विनायक सरनाईक, समाधान कणखर, नितीन राजपूत, प्रकाश आंभोरे, आत्माराम कुटे, राजू शेटे, मुरलीधर येवले, भिकनराव सोळंकी, गणेश थूट्टे, शेषराव शेळके, विनोद थूट्टे, विठ्ठल सोळंकी, अरुण नेमाने, गजानन कुटे, विठ्ठल शेळके, पप्पू लेंडे, सचिन तरमळे, समाधान भूसारी, भागवत थूट्टे, औचितराव वाघमारे, शरद थूट्टे, राजेश शेळके यांच्यासह शेतकरी व कार्यकर्ते सहभागी झाले.
शहरासह ग्रामीण भागात आंदोलनाची चर्चा….
“काजू-बदाम घ्या, पण आमच्या बांधावर या!” या घोषणेसह करण्यात आलेल्या अनोख्या ‘भीक मांगो’ आंदोलनाची चिखली शहरासह ग्रामीण भागात चर्चा झाली. शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष अडचणी शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी केलेल्या या उपक्रमातून शासनाने बैठकींपेक्षा प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थिती पाहावी, असा संदेश देण्यात आला.














