चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला अखेरच्या क्षणी ब्रेक लागल्यानंतर चिखलीच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले यांनी राहुल बोंद्रे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना महाले यांनी, “राहुल बोंद्रे मेंटली डिस्टर्ब आहेत,” असे विधान केले. तसेच बोंद्रे यांच्यावर नेमके कोणते संकट आहे, याची आपल्याला माहिती नसल्याचेही त्यांनी म्हटले.
राहुल बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशाची तयारी आधीपासूनच सुरू होती, असा दावा करत महाले यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भूमिकेवरही सवाल उपस्थित केला. “जर भाजप प्रवेशाची तयारी आधीपासून सुरू होती, तर राहुल गांधींनी तेव्हाच फोन का केला नाही? तेव्हा का ते कार्यकर्त्यांसाठी धावून आले नाहीत?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. बोंद्रे यांना स्वतःहून भाजपमध्ये यायचे होते आणि त्यांना आपल्या संस्था वाचवायच्या होत्या, असा दावाही महाले यांनी केला.
तसेच, “मी चिखलाच्या राजकारणात लक्ष देणार नाही, पक्षाच्या संघटनात्मक कामातही लक्ष घालणार नाही,” असे राहुल बोंद्रे यांनी स्वतः सांगितले होते, असा दावा आमदार महाले यांनी केला. त्यामुळे बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशामागील नेमकी भूमिका काय होती, यावरून आता चिखलीच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
राहुल बोंद्रे यांच्या राजकीय कारकिर्दीवरही महाले यांनी थेट भाष्य केले. “ते दोन वेळा विधानसभेत पडले, नगरपालिकेतही त्यांची डाळ शिजली नाही. जो माणूस दोन निवडणुका हरतो, त्यांच्या येण्याने कोणत्या पक्षाचा फायदा होणार?” असा सवाल त्यांनी केला. दरम्यान, बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू असताना त्यांच्या निवासस्थानासमोर समर्थकांची गर्दी झाली होती. मुंबईकडे जाण्यासाठी कार्यकर्त्यांची तयारीही सुरू होती. मात्र राहुल गांधी यांच्याशी झालेल्या फोनवरील संवादानंतर बोंद्रे यांनी भाजपमध्ये न जाण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त समोर आले आहे.
या संपूर्ण नाट्यमय घडामोडीनंतर चिखलीच्या राजकारणात आता पुन्हा आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले असून, राहुल बोंद्रे आणि श्वेता महाले यांच्यातील राजकीय संघर्षाला नव्याने धार येण्याची शक्यता आहे.














