मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): ‘तू माझ्या घरातून सर्व सामान घेऊन निघून का गेली नाहीस?’ या कारणावरून एका महिलेवर चाकूने वार करून तिला जखमी केल्याची घटना मलकापूर शहरात घडली. यावेळी महिलेची बहीण आणि भाऊजी मध्यस्थी करण्यासाठी आले असता त्यांच्यावरही चाकूने वार करून जखमी केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून मलकापूर शहर पोलिसांनी एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मी प्रकाश रावणचवरे (वय २३, व्यवसाय गृहिणी, रा. सुभाषचंद्र बोस नगर, मलकापूर) यांनी तक्रार दिली आहे. १५ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे १०.१५ वाजता लक्ष्मी या त्यांच्या बहिणीसह घरी असताना आरोपी आकाश साहेबराव रावणचवरे (वय २७, रा. बहापुरा, ता. मलकापूर) हा हातात चाकू घेऊन घरात शिरला.
‘तू माझ्या घरातून सर्व सामान घेऊन निघून का गेली नाहीस?’ असे म्हणत आरोपीने हातातील चाकूने लक्ष्मी यांच्या उजव्या छातीवर वार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या घटनेत त्या जखमी झाल्या. त्यांची बहीण सोडविण्यासाठी धावून आली असता तिच्या उजव्या हाताच्या दोन बोटांवरही चाकूने वार केल्याचा आरोप आहे.
दरम्यान, लक्ष्मी यांचे भाऊजी सतीश वन्हाडे हे तेथे आले असता त्यांच्यावरही डाव्या बाजूला पोटावर चाकूने वार करून जखमी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच आरोपीने सर्वांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी मलकापूर शहर पोलिस ठाण्यात आरोपी आकाश रावणचवरे याच्याविरुद्ध अप.क्र. ६७६/२०२६ नुसार कलम १०९(१), ३३३, ३५१(२) बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनि कुनाल जाधव करीत आहेत.













