शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): फेसबुकवरील ओळखीचा गैरफायदा घेत एका ३६ वर्षीय स्टाफ नर्सला लग्नाचे आमिष तसेच संसार उद्ध्वस्त करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शेगाव ग्रामीण पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला अकोला येथे स्टाफ नर्स म्हणून कार्यरत आहेत. फेसबुकच्या माध्यमातून त्यांची रोहित गजानन पहुरकर (वय ३२, रा. आम्रपाली नगर, शेगाव) याच्याशी ओळख झाली. आरोपीने आपल्या पत्नीला मूल होत नसल्याचे सांगून पीडितेची सहानुभूती मिळवली. त्यानंतर तो अकोला येथील नागरी आरोग्य केंद्रात भेटण्यासाठी जाऊ लागला आणि गोड बोलून तिचा विश्वास संपादन केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
त्यानंतर १३ सप्टेंबर २०२५ रोजी आरोपीने आपल्या आजोबांच्या आजारपणाचे कारण सांगून पीडितेला शेगाव येथे बोलावून घेतले. ‘शांततेत बसून बोलू’ असे सांगून तो तिला खामगाव रोडवरील एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. तेथे महिलेच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर आरोपीने सदर प्रकार कुणाला सांगितल्यास किंवा शेगावला येण्यास नकार दिल्यास, घडलेला प्रकार तिच्या पतीला सांगून संसार उद्ध्वस्त करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या धमकीचा आणि दबावाचा गैरफायदा घेत आरोपीने पीडितेवर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे. अखेर महिलेने धाडस करून पोलिसांत तक्रार दाखल केली. सुरुवातीला अकोला येथील सिव्हिल लाइन पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतर प्रकरण शेगाव ग्रामीण पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले.
दरम्यान, या गंभीर प्रकरणाची दखल घेत शेगाव ग्रामीणचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण लिंगाडे यांनी १० सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास सपोनि प्रवीण लिंगाडे करीत आहेत.














