डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : कौटुंबिक वादाच्या प्रकरणात पोलिसांकडून कारवाई होत नसल्याचा आरोप करीत एका तरुणाने थेट डोणगाव पोलीस स्टेशनसमोरील गेटवर विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (१९ मे) सकाळी सुमारे ११ वाजता घडली. पोलिसांनी प्रसंगावधान राखत संबंधित युवकाला तातडीने रुग्णालयात दाखल केल्याने अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, डोणगाव येथील साजन शाह अब्दुल शाह याचा पत्नीशी कौटुंबिक वाद सुरू होता. या प्रकरणी त्याने डोणगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. मात्र, आपल्या तक्रारीवर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करीत तो काही दिवसांपासून मानसिक तणावात होता.
अखेर संतापाच्या भरात साजन शाह हा सोमवारी सकाळी डोणगाव पोलीस स्टेशनसमोर आला आणि गेटजवळच विषारी औषध प्राशन केले. घटनेची माहिती मिळताच उपस्थित पोलिसांनी तातडीने धाव घेत युवकाला ताब्यात घेतले व प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात रेफर करण्यात आले.
दरम्यान, साजन शाह याने पोलिसांकडे दिलेल्या माहितीनुसार, “मी माझ्या सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दिली होती. मात्र, पोलिसांकडून सतत उडवाउडवीची उत्तरे दिली जात होती. कारवाई होत नसल्याने नैराश्यातून मी हे पाऊल उचलले,” असे सांगितले.
या संदर्भात डोणगावचे ठाणेदार अमरनाथ नागरे यांनी सांगितले की, “साजन शाह याचे पत्नीसोबत कौटुंबिक वाद सुरू असून या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल आहे. त्याच्या सासरच्या लोकांविरुद्ध आवश्यक कारवाईसाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र, प्रक्रियेला विलंब होत असल्याच्या रागातून युवकाने विष प्राशन केले.”
या घटनेमुळे डोणगाव परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस स्टेशनसमोर घडलेल्या या प्रकाराची नागरिकांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.












