देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज)पोलीस भरतीसाठी जीव तोडून तयारी करणाऱ्या एका तरुणाचा धावण्याच्या चाचणीदरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना पुणे येथील शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर घडली. शनिवार, २८ मार्च रोजी सकाळी ही घटना घडली असून, संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुरुषोत्तम भीमराव बुरकुल (वय २३, रा. चिंचोली बुरकुल, ता. देऊळगाव राजा) हा युवक पोलीस भरतीची तयारी करत होता. पुणे शहर पोलीस दलाच्या भरती प्रक्रियेसाठी त्याने अर्ज केला होता आणि मैदानी चाचणीसाठी तो पात्र ठरला होता.
शनिवारी सकाळी शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर १६०० मीटर धावण्याची चाचणी सुरू होती. पुरुषोत्तमने दोन फेऱ्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या. मात्र, तिसऱ्या फेरीदरम्यान त्याला अचानक अपस्माराचा झटका आला आणि तो धावत असतानाच मैदानावर कोसळला.
घटनेची माहिती मिळताच उपस्थित उमेदवारांनी तत्काळ अधिकारी व कर्मचाऱ्यांना कळविले. मैदानावर असलेल्या वैद्यकीय पथकाने प्राथमिक तपासणी करून त्याला तातडीने ससून रुग्णालयात हलविले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
कुटुंबावर दुःखाचा डोंगर…
पुरुषोत्तमच्या वडिलांना तीन वर्षांपूर्वी अर्धांगवायूचा झटका आल्याने घराची सर्व जबाबदारी त्याच्यावर होती. अत्यंत मेहनती आणि शांत स्वभावाच्या पुरुषोत्तमच्या अकाली निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
स्वप्न अधुरंच राहिलं…
पोलीस बनून कुटुंबाची परिस्थिती सुधारण्याचं पुरुषोत्तमचं स्वप्न होतं. मात्र, नियतीने घात केलेला हा क्रूर खेळ त्याचं स्वप्न कायमचं अधुरं ठेवून गेला.














