संग्रामपूर(बुलडाणा कव्हरेज न्युज)तालुक्यातील काकोडा येथील २५ वर्षीय युवकाचा शेतात नांगरटी करताना ट्रॅक्टर उलटून खाली दबल्या गेल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना २४ मार्च रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास चोंडी टाकळेश्वर शिवारात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश अर्जुन मानखैर (वय २५) हा युवक शेतात ट्रॅक्टरद्वारे नांगरटीचे काम करीत होता. काम सुरू असताना ट्रॅक्टर वळण घेत असताना अचानक नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर उलटून शेतातील तलावाच्या खड्यात जाऊन पडले. या अपघातात गणेश ट्रॅक्टरखाली दबला गेला.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेतकरी तात्काळ घटनास्थळी धावले. त्यांनी मोठ्या प्रयत्नाने गणेशला ट्रॅक्टरखालून बाहेर काढून उपचारासाठी शेगाव येथील रुग्णालयात हलविण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुर्दैवाने रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.
गणेश मानखैर हा अत्यल्प भूधारक कुटुंबातील असून तो रोजंदारीवर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. त्याच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ व एक बहीण असा परिवार आहे. या अचानक झालेल्या अपघातामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात हळहळ व्यक्त होत आहे.














