बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्यूज): राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही प्रत्यक्षात कर्जमाफी नसून फसवी “वन टाइम सेटलमेंट” योजना असल्याचा आरोप करत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आज (१५ जून) सकाळपासून अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली. बुलढाणा शहरातील चिखली रोडवरील स्वतःच्या निवासस्थानासमोर उभारलेल्या मंडपात ते अन्नत्याग आंदोलनाला बसले असून, जिल्ह्यासह राज्यभरातील शेतकरी टप्प्याटप्याने या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बुलढाण्यात दाखल होताना दिसतील…
आंदोलनास प्रारंभ करण्यापूर्वी रविकांत तुपकर यांनी भागातशिंग यांच्या प्रतिमेचे पूजन करून आणि आपल्या आई-वडिलांचे दर्शन घेतले. त्यानंतर पत्नी शर्वरी तुपकर यांनी त्यांचे औक्षण करून आंदोलनासाठी शुभेच्छा दिल्या. या भावनिक क्षणानंतर तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली.
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना रविकांत तुपकर यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. “सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र आता जाहीर केलेली योजना ही कर्जमाफी नसून केवळ ‘वन टाइम सेटलमेंट’ योजना आहे. या योजनेत इतक्या जाचक अटी व शर्ती घालण्यात आल्या आहेत की लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहतील,” असा आरोप त्यांनी केला.
“राज्य सरकारला जनाची नाही तर मनाचीही लाज उरलेली नाही. आधी कर्जमाफीचे आश्वासन दिले आणि आता फसवेगिरी केली. सरकारचा हा निव्वळ नौटंकीपणा असून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे,” असा घणाघाती आरोपही त्यांनी केला.
आंदोलनस्थळी शेतकऱ्यांनी मोठा मंडप उभारला असून मंचावर लावलेला शहीद भगतसिंग यांचा फोटो आंदोलकांमध्ये उत्साह निर्माण करत आहे. शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमुक्ती आणि जाचक अटींशिवाय प्रभावी कर्जमाफीची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका रविकांत तुपकर यांनी स्पष्ट केली.
दरम्यान, या अन्नत्याग आंदोलनाकडे राज्यभरातील शेतकरी आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, येत्या काही दिवसांत आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शेतकरी नेते रविकांत तुपकर हे स्पष्ट बोलले….
आज पासून मी सरसकट कर्जमाफीसाठी आणि पिक विमा मिळावा याच्या सह इतर काही मागणी साठी आजपासून मी अन्नत्याग आंदोलन सुरू करणार आहे जोपर्यंत या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत मी अन्नाचा कण सुद्धा खाणार नाही अशी भूमिका शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी घेतले आहे….













