बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज):शहर असो की गावखेडं, सध्या लग्नसमारंभ म्हटलं की दिखावा, मानपान आणि मोठ्या लोकांचा सत्कार यालाच जास्त महत्त्व मिळताना दिसतंय. आमंत्रण पत्रिकेत मात्र ‘आपली उपस्थितीच आमच्यासाठी आशीर्वाद’ असं गोड बोल लिहिलेलं असतं, पण प्रत्यक्ष लग्नात काही मोजक्या श्रीमंत, पुढारी किंवा मोठ्या पदावर असलेल्या लोकांचंच नाव स्टेजवरून पुकारलं जातं. त्यांना फेटा, हार, गुच्छ देऊन मान दिला जातो, तर साधा माणूस मात्र कोपऱ्यात बसून हा तमाशा बघत राहतो.
लग्न हा दोन जीवांचा आणि दोन कुटुंबांच्या भावनांचा संगम असतो. त्या आनंदात सहभागी व्हायला अनेक पाहुणे शेतीची कामं सोडून, रोजंदारी बंद करून किंवा लांबचा प्रवास करून येतात. त्यांच्या मनात फक्त आपुलकी आणि प्रेम असतं. पण स्टेजवरच्या मानपानाच्या झगमगाटात त्यांच्या भावनांची किंमत कमी झाल्यासारखी वाटते.
आजकाल काही ठिकाणी लग्न म्हणजे सामाजिक प्रतिष्ठेचं प्रदर्शन झालंय. ‘कोण आला?’, ‘कोणाचा सत्कार झाला?’, ‘कोणाला फेटा बांधला?’ यावरूनच लग्नाचं महत्त्व ठरवलं जातं. काही मान्यवर येतात, फोटो काढून घेतात आणि निघून जातात. पण लग्न व्यवस्थित पार पाडण्यासाठी धावपळ करणारे, पाहुण्यांची सेवा करणारे नातेवाईक, मित्र आणि गावातील सामान्य माणूसच असतो.
मान देण्याची परंपरा चांगली असली, तरी ती फक्त निवडक लोकांपुरती मर्यादित राहिली तर सामान्य पाहुण्यांचा अवमान होण्याची शक्यता वाढते. लग्न हा दिखाव्याचा नव्हे तर प्रेम, आपुलकी आणि समानतेचा सोहळा आहे, ही जाणीव समाजाने पुन्हा जपण्याची गरज निर्माण झाली आहे.














