मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील वरखेड येथे सावत्र आईकडून १४ वर्षीय मुलीचा अमानुष छळ व बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलिसांत संबंधित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, चाइल्ड हेल्पलाइनच्या तत्पर कारवाईमुळे पीडित मुलीची सुटका करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वरखेड गावात एका सूज्ञ नागरिकाने चाइल्ड हेल्पलाइनच्या १०९८ या क्रमांकावर संपर्क साधून सावत्र आईकडून मुलीवर अत्याचार होत असल्याची माहिती दिली. या तक्रारीची तातडीने दखल घेत चाइल्ड हेल्पलाइनने जिल्हा बाल संरक्षण यंत्रणेशी समन्वय साधत कारवाई सुरू केली.
२२ मार्च रोजी प्रकल्प समन्वयक शेख सोहेब यांच्या नेतृत्वाखाली, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अमोल डिघुळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी दिवेश मराठे तसेच बाल कल्याण समिती यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने वरखेड येथे धाड टाकली. यावेळी संबंधित मुलीची चौकशी केली असता, सावत्र आईकडून तिच्यावर नियमित मारहाण होत असल्याचे स्पष्ट झाले. मारहाणीमुळे मुलीच्या अंगावर वळ उमटल्याचेही आढळून आले.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्याला माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पुढील कारवाई केली. चाइल्ड हेल्पलाइनच्या पथकाने पीडित मुलगी व तिच्या मोठ्या भावाला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर संबंधित सावत्र आईविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून, मुलीची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली.
दरम्यान, पीडित मुलीस बाल कल्याण समितीसमोर हजर करण्यात आले. समितीच्या आदेशानुसार तिच्या संरक्षणासाठी तिला ‘सखी वन स्टॉप सेंटर’मध्ये दाखल करण्यात आले आहे. तसेच चाइल्ड हेल्पलाइनच्या समुपदेशकांकडून मुलीचे समुपदेशन सुरू आहे.
या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून, अशा प्रकारांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे. प्रकरणाचा पुढील तपास बाल कल्याण समितीच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
















