खामगाव/शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : ज्येष्ठ गौरी पूजनासाठी लागणाऱ्या महालक्ष्मीच्या मूर्तींच्या खरेदी-विक्रीसाठी छत्रपती संभाजीनगर येथून बुलढाणा जिल्ह्यात आलेल्या ४३ वर्षीय व्यावसायिकाचा खामगावातील अग्रसेन चौकात आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना ३ सप्टेंबर रोजी घडली. दरम्यान, मृत व्यावसायिकासह त्याच्या नातेवाईकाला शेगाव येथे मारहाण करून माल, रोख रक्कम व कागदपत्रे बळजबरीने हिसकावून घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या मृत्यू प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळाले आहे.
मृत व्यावसायिकाचे नाव विकास रामदास वाणी (वय ४३, रा. गुलमंडी, छत्रपती संभाजीनगर) असे आहे. ते महालक्ष्मीच्या मूर्ती विक्रीचा व्यवसाय करीत होते. ज्येष्ठ गौरी पूजनासाठी महालक्ष्मीच्या मूर्ती खरेदी करण्यासाठी ते २ सप्टेंबर रोजी नातेवाईक रामेश्वर लक्ष्मण चौधरी यांच्यासह शेगावकडे रवाना झाले होते.
तक्रारीनुसार, २ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे १० वाजता ते शेगाव येथे पोहोचले. त्यांच्यासोबत चालक नूर शेख होता. दोघांकडे मिळून सुमारे ५ लाख ४० हजार रुपये रोख असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. गणेशपूर येथून महालक्ष्मीचे मुखवटे व बॉडी असा सुमारे ३ लाख ६४ हजार रुपयांचा माल खरेदी करण्यात आला.
माल गाडीत भरत असताना सागर खानझोडे (रा. शेगाव) याच्यासह ५ ते ६ जण तेथे आल्याचा आरोप आहे. जुन्या बिलाच्या कारणावरून त्यांनी वाद घातला. त्यानंतर विकास वाणी यांना जबरदस्तीने चारचाकी वाहनात बसवून एका कारखान्यात नेण्यात आले. तेथे त्यांना मारहाण करण्यात आली तसेच चाकूचा धाक दाखवून मालवाहू वाहनातील संपूर्ण माल उतरवून घेतल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.
याशिवाय उर्वरित १ लाख ८६ हजार रुपये रोख रक्कम आणि खिशातील कागदपत्रे बळजबरीने हिसकावून घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या घटनेनंतर विकास वाणी हे कसेबसे तेथून बाहेर पडून खासगी वाहनाने खामगावकडे रवाना झाले, तर रामेश्वर चौधरी हे मालवाहू वाहनाच्या चालकासोबत खामगाव रोडवरील पेट्रोल पंपावर थांबले.
दरम्यान, ३ सप्टेंबर रोजी पहाटे सुमारे ४ वाजता विकास वाणी खामगाव येथे पोहोचले. त्यांनी अग्रसेन चौकाजवळील अतिथी लॉजमध्ये रूम क्रमांक ११४ बुक केली. काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर ते सकाळी चालण्यासाठी बाहेर पडले असता अग्रसेन चौकात अचानक खाली पडले.
लॉजचा कर्मचारी संजय धनसिंग राठोड हा सकाळी बाहेर साफसफाईसाठी आला असता त्याला विकास वाणी रस्त्यावर पडलेले दिसले. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. खामगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत विकास वाणी यांचा मृत्यू झालेला होता. याप्रकरणी खामगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोहेकॉ नारायण चव्हाण करीत आहेत.
दरम्यान, विकास वाणी यांचे मावसभाऊ रामेश्वर लक्ष्मण चौधरी (वय २९, रा. छत्रपती संभाजीनगर) यांनी शेगाव पोलिसांत तक्रार देऊन सागर खानझोडे याच्यासह ४ ते ६ अज्ञात व्यक्तींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
या तक्रारीनंतर शेगाव व खामगाव पोलिसांकडून प्रकरणाची चौकशी सुरू असून, विकास वाणी यांच्या मृत्यूमागील नेमके कारण काय, तसेच शेगाव येथे घडलेल्या कथित मारहाणीचा त्यांच्या मृत्यूशी काही संबंध आहे का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिसांची कारवाई व चौकशी सुरू होती.
महत्त्वाचे : शेगाव येथे मारहाण, माल व रोकड हिसकावल्याचे आरोप हे तक्रारदाराने केलेले आहेत. या आरोपांची सत्यता पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.













