Advertisement Advertisement

कवठळमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; गोठ्यात घुसून शेळी केली ठार! दोन महिन्यांत तीन बकऱ्यांचा फडशा; शेतकरी-पशुपालकांमध्ये दहशत, वनविभागाने गस्त वाढविण्याची मागणी…

मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्युज) : मेरा बु. परिसरातील कवठळ येथे बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थांसह शेतकरी आणि पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याने रात्रीच्या सुमारास गोठ्यात बांधलेल्या शेळीवर हल्ला करून तिला ठार केल्याची घटना ४ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेत प्रतुल रामेश्वर गावंडे यांच्या मालकीच्या शेळीचा मृत्यू झाला असून, त्यांचे अंदाजे २५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

प्रतुल गावंडे यांच्या शेळ्या नेहमीप्रमाणे गोठ्यात बांधलेल्या होत्या. रात्रीच्या वेळी बिबट्याने गोठ्यात प्रवेश करून एका शेळीवर हल्ला केला. सकाळी शेळी मृतावस्थेत आढळून आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती पोलीस पाटील गणेश वाघमारे तसेच सरपंच यांनी वनविभागाला दिली.

माहिती मिळताच वनविभागाचे प्रदीप प्रकाश मुंढे (वनपाल, बुलडाणा) आणि जि. एम. पोटे (वनरक्षक, अंचरवाडी बिट) यांनी घटनास्थळी भेट देत मृत शेळीचा पंचनामा केला. पंचनाम्यानंतर शेतकऱ्याचे सुमारे २५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले.

दोन महिन्यांत तीन बकऱ्यांचा बिबट्याने घेतला बळी….

कवठळ परिसरात बिबट्याच्या हल्ल्याची ही पहिलीच घटना नसून, सुमारे दोन महिन्यांपूर्वी याच परिसरात शिवाजी घुबे यांच्या दोन बकऱ्यांवर बिबट्याने हल्ला करून त्यांना ठार केले होते. आता पुन्हा एका शेळीचा बळी गेल्याने बिबट्याचा परिसरात वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

बिबट्याच्या वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे रात्रीच्या वेळी शेतात जाण्यास तसेच जनावरे गोठ्यात बांधण्यासही शेतकरी व पशुपालकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे वनविभागाने परिसरात नियमित गस्त वाढवून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

मृत शेळीचा पंचनामा करताना गणेश वाघमारे, पंढरीनाथ गावंडे, सतीश गावंडे, श्रीराम गावंडे, शालिग्राम कन्हाडे आणि ज्ञानेश्वर राऊत यांची उपस्थिती होती.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!