धोत्रा भणगोजी (बुलडाणा कव्हरेज न्युज): गेल्या सहा वर्षांपासून कार्यरत असलेले धोत्रा भणगोजी येथील विद्युत उपकेंद्र सध्या परिसरातील शेतकऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. नवीन उपकेंद्र सुरू झाल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत होण्याऐवजी वारंवार खंडित होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या आंधई व परिसरातील शेतकऱ्यांनी बुधवार, २ सप्टेंबर रोजी धोत्रा भणगोजी विद्युत उपकेंद्रावर धडक देत जोरदार निदर्शने केली.
यापूर्वी २२ ऑगस्ट रोजीही शेतकऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत वीज समस्येबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी अधिकाऱ्यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यानंतरही परिस्थितीत सुधारणा झाली नसल्याने शेतकऱ्यांचा संताप आणखी वाढला आहे.
सकाळी चार, संध्याकाळी चार तास वीज बंद?
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कोणताही अधिकृत भारनियमनाचा नियम नसताना सकाळी तब्बल चार तास आणि संध्याकाळी चार तास अशा प्रकारे दिवसातून सुमारे आठ तास वीजपुरवठा खंडित केला जात आहे. एवढेच नव्हे तर उर्वरित वेळेतही अवघ्या १० ते १५ मिनिटांच्या अंतराने वीज ये-जा करत असल्याने शेतीपंप चालवणे कठीण झाले आहे.
यंदा पावसाने ओढ दिल्याने सोयाबीनचे पीक आधीच संकटात आहे. अनेक शेतकऱ्यांच्या विहिरींमध्ये पाणी उपलब्ध असून, केवळ वेळेवर वीज मिळाल्यास पिकांना पाणी देता येणे शक्य आहे. मात्र, वीज सलग तासभरही उपलब्ध राहत नसल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे अशक्य होत आहे. डोळ्यांदेखत सोयाबीनची पिके वाळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.
‘वीज सुरळीत करा, अन्यथा उपकेंद्र बंद पाडू’….
संतप्त शेतकऱ्यांनी बुधवारी धोत्रा भणगोजी उपकेंद्रावर एकत्र येत जोरदार घोषणाबाजी व निदर्शने केली. सरपंच श्रीकृष्ण चोथे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्यांची व्यथा मांडली. वीजपुरवठ्याची समस्या तात्काळ सोडवून शेतीसाठी सुरळीत वीज उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
‘वीजपुरवठा तात्काळ सुरळीत केला नाही, तर हे उपकेंद्र बंद पाडू,’ असा इशारा सरपंचांसह संतप्त शेतकऱ्यांनी दिला. आंदोलनाची माहिती मिळताच अमडापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या उपस्थितीमुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली आणि पुढील अनर्थ टळला.
या आंदोलनात सरपंच श्रीकृष्ण चोथे, सुनील गुरवे, गजानन बराटे, गणेश भुतेकर, सुधीर गोलांडे, शिदुवा तवर, उमेश साळोक, विजय जाधव, सुभाष गार्डे, गणेश चोथे, निलेश शेळके, शिवदास साळोक, गोपाल तवर, समाधान मापारी, राजू वाघमारे, एकनाथ भुतेकर यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शेतकऱ्यांच्या या आंदोलनामुळे आता महावितरण प्रशासन वीजपुरवठ्याची समस्या किती तत्काळ सोडवते, याकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
















