अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज): गेल्या दोन वर्षांपासून पत्नीपासून विभक्त राहात असलेल्या ३५ वर्षीय युवकाने राहत्या घरी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना ३० ऑगस्ट रोजी दुपारी उघडकीस आली. भास्कर विठ्ठल ढोले (वय ३५, रा. शेलगाव आटोळ) असे मृत युवकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भास्कर ढोले हे आपल्या दोन मुलांसह शेलगाव आटोळ येथे राहत होते. त्यांची पत्नी मागील दोन वर्षांपासून त्यांच्यासोबत राहत नव्हती. पत्नीपासून विभक्त राहिल्याने भास्कर हे नैराश्यात होते. तसेच ते दारूच्या आहारी गेल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
३० ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास भास्कर यांचे चुलत काका वसंता ढोले हे शेतात काम करण्यासाठी गेले होते. दरम्यान, अतुल बोडे (रा. अंचरवाडी) व दीपक जैन (रा. शेलगाव आटोळ) यांनी शेतात जाऊन वसंता ढोले यांना भास्कर यांनी राहत्या घरी आत्महत्या केल्याची माहिती दिली.
ही माहिती मिळताच वसंता ढोले गावात परतले. त्यांनी भास्कर यांच्या राहत्या घरी जाऊन पाहणी केली असता ते घरातील लोखंडी अँगलला दोरीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
पत्नीपासून विभक्त राहण्यामुळे आलेल्या नैराश्यातून भास्कर यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेची नोंद अंढेरा पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत.













