Advertisement Advertisement

चोरून चोरून लग्न केलं… अन् १४ दिवसांनी बालविवाहाचा भांडाफोड; वरासह चौघांवर गुन्हा!

नांदुरा (बुलडाणा कव्हरेज न्युज): चाइल्ड हेल्पलाइनवर प्राप्त झालेल्या तक्रारीच्या आधारे नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी येथे झालेला बालविवाह उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे विवाह झाल्यानंतर तब्बल १४ दिवसांनी ही बाब समोर आली. या प्रकरणी वर करण देवीदास बोरले याच्यासह चार जणांविरुद्ध नांदुरा पोलिस ठाण्यात बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ३० मे रोजी निंबोळा देवी संस्थान येथे वडनेर भोलजी येथील करण देवीदास बोरले याच्यासोबत एका अल्पवयीन मुलीचा विवाह लावण्यात आला होता. दरम्यान, १२ जून रोजी चाइल्ड हेल्पलाइन (१०९८) वर या बालविवाहाबाबत तक्रार प्राप्त झाली. तक्रारीची गंभीर दखल घेत महिला व बाल विकास विभागांतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चाइल्ड हेल्पलाइनने तातडीने कारवाई सुरू केली.

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अमोल डिघुळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी दिवेश मराठे तसेच बालकल्याण समितीचे अध्यक्ष मनोज डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली चाइल्ड हेल्पलाइनचे प्रकल्प समन्वयक शेख सोहेप, समुपदेशक विद्या खरे, पर्यवेक्षक सागर नरवाडे, प्रवीण गवई, केस वर्कर मुकेश मोरे व राहुल सुरडकर यांनी संबंधित यंत्रणांशी समन्वय साधत तपास सुरू केला.

चाइल्ड हेल्पलाइनच्या पथकाने बालविवाह प्रतिबंधक अधिकारी, ग्रामसेवक, स्थानिक पोलीस तसेच पोलीस हेल्पलाइन ११२ यांच्या मदतीने वडनेर भोलजी येथे भेट देऊन चौकशी केली. यावेळी अल्पवयीन मुलीचा विवाह झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर संबंधित मुलीला बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले. समितीने पीडित मुलीची चौकशी करून बालविवाह झाल्याची खात्री झाल्यानंतर कायदेशीर कारवाईचे आदेश दिले.

समितीच्या निर्देशानुसार १६ जून रोजी बालविवाह प्रतिबंध अधिकारी विकास शिवदे यांनी नांदुरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून करण देवीदास बोरले याच्यासह चार जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंध कायदा २००६ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!