Advertisement Advertisement

जुन्या वादातून घरासमोर धुडगूस; दुचाकीची तोडफोड, दरवाजा तोडून घरात घुसल्याचा आरोप….

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : जुन्या वादाचा राग मनात धरून घरासमोर धुडगूस घालत दुचाकीची तोडफोड करणे, घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश करणे, कुटुंबीयांना धक्काबुक्की करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार बुलढाणा शहरातील कारंजा चौक परिसरात घडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी भाजपचे नगरसेवक आकाश दळवी, प्रकाश ऊर्फ टिल्लू गोरले यांच्यासह १० ते १२ अनोळखी व्यक्तींविरुद्ध बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिलेने विनयभंग केल्याचाही आरोप केला आहे.

८ सप्टेंबर रोजी रात्रीची घटना…

कारंजा चौकातील तिरुपती मंगल कार्यालयासमोर ८ सप्टेंबर रोजी रात्री हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे. ४० वर्षीय महिलेने ९ सप्टेंबर रोजी बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, जुन्या वादाच्या कारणावरून आरोपी आणि त्यांच्यासोबत आलेल्या अनोळखी व्यक्तींनी घरासमोर गोंधळ घालत दुचाकीचे नुकसान केल्याचा आरोप आहे.

दरवाजा तोडून घरात प्रवेश केल्याचा आरोप…

या प्रकारामुळे घाबरलेल्या कुटुंबीयांनी घराचा दरवाजा बंद करून घेतला. मात्र, आरोपींनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर महिलेच्या पतीला शिवीगाळ करून धक्काबुक्की करण्यात आली. वाद सोडविण्यासाठी पुढे आलेल्या महिलेच्या सासूलाही धक्का दिल्याचा आरोप आहे.

मुलांना जीवे मारण्याची धमकी; विनयभंगाचाही आरोप…

महिलेच्या दोन्ही मुलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तसेच आकाश दळवी यांनी आपला विनयभंग केल्याचा आरोप महिलेने केला आहे. या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलिसांनी आकाश दळवी, प्रकाश ऊर्फ टिल्लू गोरले आणि १० ते १२ अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!