बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील मलकापूर रोड परिसरातील गुलाबचंद नगर येथे एका विहिरीत अंदाजे ४० ते ४५ वर्षे वयोगटातील अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून, बुलढाणा शहर पोलिसांनी नागरिकांना या व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुलाबचंद नगर येथील बेनीश्याम अग्रवाल यांच्या दुकानाशेजारी असलेल्या विहिरीतून दुर्गंधी येत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. संशय आल्याने विहिरीत पाहणी केली असता त्यामध्ये एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच बुलढाणा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह विहिरीतून बाहेर काढून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मृत व्यक्तीचे वय अंदाजे ४० ते ४५ वर्षे असल्याचे सांगण्यात येत असून, त्याची ओळख पटविण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
या प्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, मृत व्यक्तीबाबत कोणाला काही माहिती असल्यास किंवा आपल्या परिचयातील व्यक्ती बेपत्ता असल्यास त्यांनी तातडीने बुलढाणा शहर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. मृत्यूचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे.













