चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शेतात अपेक्षित उत्पन्न होत नसल्याने तसेच शेतीवरील बँकेचे पीक कर्ज आणि मुलीच्या लग्नासाठी घेतलेल्या कर्जाच्या चिंतेतून एका शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आपले जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील मुरादपूर येथे घडली आहे.
मुरादपूर येथील समाधान सखाराम गाडेकर (वय ५०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे गट नंबर ६० मध्ये सुमारे ३ एकर सामाईक शेती असून त्याची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर होती. यावर्षी शेतीत अपेक्षित उत्पादन न झाल्यामुळे ते आर्थिक अडचणीत सापडले होते. शेतीसाठी घेतलेल्या बँकेच्या कर्जाची परतफेड कशी करावी, तसेच मागील वर्षी मुलीच्या लग्नासाठी घेतलेले कर्ज कसे फेडावे, या चिंतेमुळे ते काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होते.
शनिवारी ते पत्नी व मुलासोबत शेतात गेले होते. पत्नी व मुलगा एका बाजूला काम करत असताना, त्यांनी एकांत साधून विषारी औषध प्राशन केल्याची माहिती मिळत आहे. काही वेळानंतर ते दिसत नसल्याने पत्नीने शोध घेतला असता ही बाब उघडकीस आली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी हलविण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या प्रकरणी पुढील तपास संबंधित पोलीस करत आहेत.












