चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली तालुक्यातील तालुक्यातील वाघापूर शिवारात वाघापूर येथील दोन शेतकऱ्याचा शेतजमिनीच्या वादातून सख्ख्या देराने आपल्या कुटुंबीयांसह भावजय व भावावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी रायपूर पोलीस स्टेशनमध्ये पाच जणांविरुद्ध विनयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे…
२८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास वैशाली संजय ठेंग (वय ३५) या आपल्या पतीसह वाघापूर येथील शेतातील गट क्र. २०१ मध्ये मोटर बंद करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी तेथे असलेल्या अशोक साहेबराव ठेंग याने “तू या जागेत कशी आली?” असे म्हणत वाद घातला. वाद वाढताच अशोक ठेंग याने वैशाली ठेंग यांना खाली पाडून काठीने पाठीवर, हातावर व डोळ्यावर मारहाण केली तसेच विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.
पत्नीला वाचवण्यासाठी पती मध्ये पडले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. त्यानंतर आरोपीने मुलगा तुषार, विशाल तसेच पत्नी सविता व विष्णु ठेंग यांना बोलावून घेत सर्वांनी मिळून बेकायदेशीर जमाव करून पती-पत्नीला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी वैशाली ठेंग यांच्या तक्रारीवरून रायपूर पोलिसांनी अशोक साहेबराव ठेंग, विशाल अशोक ठेंग, तुषार अशोक ठेंग, सविता अशोक ठेंग व विष्णु भगवान ठेंग (सर्व रा. वाघापूर) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस अंमलदार दशरथ शितोळे करीत आहेत.














