मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : “फेरफारची नोटीस का प्रसिद्ध केली नाही?” या कारणावरून मोताळा तहसील कार्यालयात तलाठ्यावर मारहाण केल्याची धक्कादायक घटना ६ एप्रिल २०२६ रोजी दुपारी सुमारे सव्वातीन वाजता घडली. या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी दोघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
तलाठी विश्वनाथ बळीराम उबरहंडे (रा. सानेनगर, बुलढाणा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते मोताळा तहसील कार्यालयात कर्तव्यावर असताना सुनिल घाटे व विजय धांडे (दोन्ही रा. मोताळा) यांनी फेरफारची नोटीस प्रसिद्ध का केली नाही, यावरून वाद घातला. यावेळी दोघांनी उबरहंडे यांना चापटा-बुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली.
याच दरम्यान आरोपींनी कार्यालयातील शासकीय लॅपटॉप व महत्त्वाची कागदपत्रे खाली फेकून देत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. तसेच “जीवे मारण्याची धमकी” देत खोट्या तक्रारी करून नोकरीवरून काढून टाकण्याची धमकीही दिली.
या फिर्यादीवरून बोराखेडी पोलिसांनी सुनिल घाटे व विजय धांडे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १३२, ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पीएसआय राजेंद्र कपले करीत आहेत.













