खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील नगरपरिषद टर्निंग परिसरातून १९ वर्षीय युवती संशयास्पदरीत्या बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी खामगाव शहर पोलीस ठाण्यात मिसिंग प्रकरणाची कायमी नोंद क्र. १६/२०२६ दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २२ मार्च रोजी सायंकाळी सुमारे ७.३० वाजताच्या सुमारास संबंधित युवती प्रवासासाठी थांबलेली होती. त्यावेळी ‘पाणी घेऊन येते’ असे सांगून ती एकटीच निघून गेली. मात्र बराच वेळ उलटूनही ती परत न आल्याने नातेवाईकांना संशय आला. त्यांनी परिसरात तसेच ओळखीच्या ठिकाणी तिचा शोध घेतला, मात्र कोणताही ठावठिकाणा लागला नाही.
शेवटी नातेवाईकांनी खामगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी तत्काळ मिसिंगची नोंद करून तपास सुरू केला आहे.
हरविलेल्या युवतीचे वर्णन असे की, उंची अंदाजे ५.३ फूट, गोरा रंग, अंगात जांभळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस व पायात काळे बूट होते.
दरम्यान, या घटनेमुळे शहरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी शोधमोहीम तीव्र केली आहे. नागरिकांनी संबंधित युवतीबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ खामगाव शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.














