Advertisement Advertisement

सुलतानपुरात स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात संताप; ‘जोडेमारो’ आंदोलनाचा इशारा…

सुलतानपूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : महावितरणकडून गावात स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती केली जात असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती तात्काळ थांबवावी, अन्यथा ‘जोडेमारो’ आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा नागवंशी संघपाल पनाड यांनी महावितरण प्रशासनाला दिला आहे.

सुलतानपूर ग्रामपंचायतीच्या वतीने स्मार्ट मीटर बसवू नयेत, याबाबत ग्रामसभेत ठराव घेण्यात आला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र, ग्रामसभेच्या ठरावानंतरही महावितरणचे अधिकारी व कर्मचारी गावात स्मार्ट मीटर बसविण्यासाठी येत असून, नागरिकांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

‘मीटर बसवला नाही तर गुन्हे दाखल करू’ अशी धमकी दिली जात असल्याने गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे, असा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. ग्रामस्थांच्या इच्छेविरुद्ध स्मार्ट मीटर बसविण्याची कारवाई तातडीने थांबवावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यासंदर्भात देण्यात आलेल्या निवेदनावर नागवंशी संघपाल पनाड, अनित्य घेवंदे, अख्तर भाई, दामुअण्ण सुरूशे, पुरुषोत्तम गाडेकर, डॉ. देसाई, गोविंद मंत्री, सुखदेव देसाई, संतोष शिंदे, संतोष पाटील, अमीर भाई, सद्दाम भाई, गणेश रत्नपारखी, असिम पठाण, दामोधर कुकडे यांच्यासह शेकडो नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती थांबवून ग्रामस्थांच्या मागणीचा गांभीर्याने विचार करावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!