Advertisement Advertisement

इन्स्टाग्राम स्टोरीवरून तरुणावर जीवघेणा हल्ला; वडिलांसमोरच दगडाने फोडले डोके…

नांदुरा (बुलडाणा कव्हरेज न्युज): केवळ इन्स्टाग्राम स्टोरी ठेवल्याच्या कारणावरून आणि जुन्या प्रेमसंबंधाच्या वादातून २२ वर्षीय तरुणावर रक्तरंजित हल्ला झाल्याची धक्कादायक घटना नांदुरा शहरात घडली. विशेष म्हणजे, मुलाला वाचवण्यासाठी गेलेल्या वडिलांच्या डोळ्यांसमोरच आरोपींनी तरुणाला बेदम मारहाण करत दगडाने डोके फोडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

नालंदा नगर येथील ऋतिक संजय बिराडे (वय २२) हा कपड्याच्या दुकानावर मजुरीचे काम करतो. ऋतिकचे आरोपी सक्षम याच्या बहिणीसोबत काही महिन्यांपूर्वी प्रेमसंबंध होते. हे संबंध संपुष्टात आल्यानंतर आरोपीच्या मनात राग निर्माण झाला होता. दरम्यान, १५ एप्रिल रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास इन्स्टाग्राम स्टोरीच्या कारणावरून सक्षम याने ऋतिकला फोन करून शिवीगाळ केली व जाब विचारत भेटायला बोलावले.

वाद चिघळू नये म्हणून ऋतिकचे वडील संजय बिराडे हे मुलासह डॉ. मानकर हॉस्पिटलसमोरील संचेती ले-आऊट परिसरात गेले. यावेळी समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू असतानाच आरोपी सक्षम याने संतापाच्या भरात जमिनीवरील मोठा दगड उचलून ऋतिकच्या डोक्यात जोरदार मारला. या हल्ल्यात ऋतिक गंभीर जखमी झाला असून त्याच्या खांद्यावर व हातावरही मारहाण करण्यात आली.

यावेळी आरोपी रणवीर वानखडे व अन्य दोघांनी ऋतिकला पकडून ठेवत सक्षमने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी ऋतिक बिराडे यांच्या फिर्यादीवरून नांदुरा पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार सय्यद मोहिद्दीन करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!