Advertisement Advertisement

घाटपुरी शिवारात बिबट्याची एन्ट्री; घाबरून दोन महिला झाडावर चढल्या…

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज): खामगाव तालुक्यातील घाटपुरी शिवारात शुक्रवारी (दि. २७ फेब्रुवारी) सकाळच्या सुमारास बिबट्या दिसल्याने शेतकरी व मजुरांमध्ये एकच घबराट पसरली.

बिबट्याला पाहून दोन महिला मजूर घाबरून झाडावर चढल्या. पोलीस व वनविभागाच्या मदतीने त्यांना सुखरूप खाली उतरवण्यात आले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, घाटपुरी शिवारातील शेतकरी गोकुळ चोपडे यांच्या उसाच्या मळ्यात अचानक बिबट्या दिसला. त्या वेळी शेतात काम करणाऱ्या मजुरांनी बिबट्याला पाहताच आरडाओरड केली. यावेळी दोन महिला मजूर घाबरून जवळच्या झाडावर चढल्या आणि काही काळ तेथेच थांबल्या.


घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक सुरेंद्र अहेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्निल पवार यांच्यासह वनविभागाचे कर्मचारी आणि रेस्क्यू पथकही उसाच्या मळ्यात पोहोचले.
रेस्क्यू पथकाने योग्य नियोजन करून झाडावर चढलेल्या दोन्ही महिलांना सुरक्षित खाली उतरवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाकडून सापळा लावण्याची तयारी करण्यात येत असून परिसरात गस्त वाढवण्यात आली आहे.


दरम्यान, तहसीलदार सुनील पाटील, नायब तहसीलदार निखिल पाटील आणि इतर महसूल कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले. प्रशासनाने शेतकरी व नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले असून, बिबट्या दिसल्यास तात्काळ वनविभागाला माहिती देण्याचे सांगितले आहे.


सध्या घाटपुरी शिवारात बिबट्याच्या मुक्तसंचारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून वनविभाग परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!