चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) :राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा धुरळा उडत असतानाच बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका मात्र ५० टक्के आरक्षण व न्यायालयीन प्रक्रियेमुळे लांबणीवर पडल्या आहेत. याचा सर्वाधिक फटका इच्छुक उमेदवारांना बसत असून अनेकांनी आता सावध भूमिका घेत ‘वेट अॅण्ड वॉच’ मोड स्वीकारला आहे.
निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते या अपेक्षेने इच्छुक उमेदवारांनी मतदार संपर्क, कार्यकर्त्यांचे मेळावे, जेवणावळी, गाठीभेटी यावर मोठ्या प्रमाणात खर्च सुरू केला होता. मात्र निवडणुका लांबल्याने हा खर्च वाढत चालला असून, एवढा खर्च करूनही ऐनवेळी उमेदवारी मिळेलच याची शाश्वती नसल्याने इच्छुकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. त्यातच अचानक आरक्षण बदलण्याची शक्यता असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
नगरपंचायत, नगर परिषद व महानगरपालिका निवडणुका पार पडल्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होईल, अशी अपेक्षा होती. मात्र वाढीव आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित असल्याने अनेक जिल्ह्यांतील निवडणुका रखडल्या असून बुलढाणा जिल्ह्यातही त्याचा थेट परिणाम झाला आहे.
चिखली तालुक्यात यापूर्वी सात जिल्हा परिषद गट व १४ पंचायत समिती गणांची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार इच्छुक उमेदवारांची हालचाल वाढली होती. मात्र बुलढाणा जिल्हा वाढीव आरक्षणाच्या कचाट्यात सापडल्याने निवडणुका दुसऱ्या टप्प्यात ढकलण्यात आल्या. आता पूर्वीचे आरक्षण कायम राहणार की नव्याने आरक्षण सोडत निघणार, याबाबतही संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.
खर्च अन् आशेवर पाणी….
शहरी भागातील निवडणुकांच्या रणधुमाळीनंतर ‘आता आपलाच नंबर’ या विश्वासाने इच्छुकांनी मोठ्या प्रमाणात खर्च केला. मात्र अचानक निवडणुका लांबल्याने हा खर्च वाया गेल्याची भावना अनेकांत असून, आता अनेक इच्छुकांनी खर्चाला ब्रेक लावला आहे.
ऐनवेळी आरक्षण बदलाची भीती….
चिखलीतील सात जिल्हा परिषद गटांपैकी तीन सर्वसाधारण, दोन ओबीसी व दोन अनुसूचित जाती महिला, तर १४ पंचायत समिती गणांपैकी पाच सर्वसाधारण, तीन सर्वसाधारण महिला, एक ओबीसी, दोन ओबीसी महिला, एक अनुसूचित जाती व दोन अनुसूचित जाती महिला असे आरक्षण यापूर्वी जाहीर झाले होते. मात्र नव्याने आरक्षण सोडत निघण्याची शक्यता असल्याने इच्छुक पुन्हा मैदानात उतरण्याबाबत साशंक आहेत.
या पार्श्वभूमीवर आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये अनेक इच्छुक उमेदवारांनी ‘वेट अॅण्ड वॉच’ची भूमिका घेतली असून, निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
















