मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील सारोळा मारोती गावात एका २१ वर्षाच्या तरुणानं १६ वर्षाच्या अल्पवयीन पोरीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केला. एवढ्यावरच न थांबता पोरीचे फोटो काढून Instagram वर टाकत तिला आणि तिच्या भावाला जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी धामणगाव बढे पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता व पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
सारोळा मारोती येथील पीडित मुलगी (वय १६ वर्षे) ही शिक्षण घेत असून आरोपी कृष्णा निना व्यवहारे (वय २१ वर्षे) हा त्याच गावचा रहिवासी आहे. गेल्या काही दिवसांपासून आरोपी पोरीचा सतत पाठलाग करत होता.
१४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास आरोपीने पीडितेचा हात धरून तिला जबरदस्तीने गावातील महादेव मंदिरात नेले आणि तिच्यासोबत फोटो काढले. त्यानंतर आरोपी तिच्या घरी जाऊन पुन्हा वाईट उद्देशाने हात धरत, “माझ्याशी लग्न नाही केलंस तर तुझ्या भावाला मारून टाकीन,” अशी धमकी दिली.
इतक्यावरच न थांबता आरोपीने जबरदस्तीने काढलेले फोटो स्वतःच्या इंस्टाग्राम आयडीवर पोस्ट केले. त्यावर “महाशिवरात्रीला उपवास ठेवणार, पण मागणार तुलाच,” असा मजकूर लिहिला होता. हा प्रकार पीडितेच्या भावाच्या लक्षात आल्यानंतर संपूर्ण घटना उघड झाली.
पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून धामणगाव बढे पोलिसांनी आरोपी कृष्णा व्यवहारे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ७४, ७५(१)(आय), ७८, ३३३, ३५१(२), ३५१(३) तसेच पोक्सो कायद्यांतर्गत कलम ८ व १२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश जायले करीत आहेत.













