मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज):तालुक्यातील दसरखेड परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास एका घरात घुसून धिंगाणा घालणाऱ्या तरुणाला ग्रामस्थांनी रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, दसरखेड येथील संतोष निवृत्ती साठे (वय ३७) हे १५ मार्चच्या मध्यरात्री आपल्या घरी झोपलेले असताना रात्री सुमारे १२.३० वाजता आरोपी नयन बंडू दवंगे (वय १८) याने घराच्या छतावरून जिन्याच्या मार्गाने घरात प्रवेश केला. घरात हालचाल जाणवताच साठे यांना जाग आली असता समोर नयन उभा असल्याचे दिसले. त्यांनी विचारणा केली असता आरोपी दारूच्या नशेत असल्याचे दिसून आले. यावेळी त्याने साठे यांना अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.
घरातील आरडाओरड ऐकून साठे यांचा भाऊ विजय साठे यांच्यासह संदेश शिंदे, दीपक मस्कादे, संतोष बाळापुरे आणि इतर ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले. सर्वांनी मिळून आरोपीला पकडून ठेवले व पोलिसांना कळवले. माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी येऊन आरोपीला ताब्यात घेतले.
या प्रकरणी संतोष साठे यांच्या तक्रारीवरून आरोपी नयन दवंगे विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३३, २९६, ३५१ (२)(३) तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ८५(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार विजय टेकाडे करीत आहेत.












