डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): नागापूर येथे घरफोडी करून नगदीसह सोन्याची पोत लंपास केल्याची घटना २२ फेब्रुवारीच्या रात्री घडली असून ही घटना २३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागापूर येथील आयडिया टॉवरजवळील गल्लीत राहणारे संतोष गणपती खनपटे हे सध्या शेतीतील पीक काढणीच्या कामानिमित्त शेतात राहत होते. त्यांच्या घराला कुलूप असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील अलमारी उघडून त्यामध्ये ठेवलेली सुमारे ९ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत व ५ हजार रुपये नगदी असा ऐवज चोरून नेला.
दरम्यान, २३ फेब्रुवारी रोजी सकाळी संतोष खनपटे हे घरी परत आले असता घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. घरफोडी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ डोणगाव पोलीस स्टेशन येथे माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या घटनेमुळे नागापूर परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून पोलिसांनी रात्रीच्या वेळी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच घर बंद ठेवून बाहेर जाणाऱ्या नागरिकांनी आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, असेही पोलिसांनी सांगितले आहे.














