Advertisement Advertisement

दुर्गंधीने पोलिसांना लागला सुगावा; पिकअपमधून अडीच क्विंटल जनावरांची शिंगे जप्त! अमडापुर बसस्थानकाजवळ कारवाई; परवान्याविना वाहतूक करणाऱ्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल…

अमडापुर (बुलडाणा कव्हरेज न्यूज): अमडापुर बसस्थानक परिसरात उभ्या असलेल्या एका पिकअप वाहनातून तीव्र दुर्गंधी येत असल्याची माहिती मिळताच अमडापुर पोलिसांनी तातडीने कारवाई करत वाहनातून अडीच क्विंटल जनावरांची शिंगे जप्त केली. परवान्याविना या शिंगांची वाहतूक केल्याप्रकरणी चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ जून २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजता चिखलीकडून अमडापुरकडे येणारे टाटा मेगा पिकअप (क्र. MH 04 JU 1447) हे वाहन भरधाव व निष्काळजीपणे येऊन बसस्थानकाजवळील शंकर हॉटेलसमोर उभे असल्याची माहिती मिळाली. वाहनातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत असून आत जनावरांची शिंगे असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.

माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक बालाजी सानप, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक अच्युतराव सिरसाठ, पोलीस कर्मचारी दुर्गासिंग ठाकूर, प्रदीप चोपडे व अन्य कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहनचालकाने आपले नाव सैय्यद मुखतार सैय्यद सत्तार (वय ५५, रा. चिखली) असे सांगितले. मात्र, वाहनातील मालाबाबत समाधानकारक माहिती देता आली नाही.

तपासणीदरम्यान काळ्या कापडाखाली ठेवलेल्या पांढऱ्या रंगाच्या २५ पोत्यांमध्ये विविध आकारांची जनावरांची शिंगे आढळून आली. काही शिंगे वाहनात उघडीही ठेवण्यात आली होती. पोलिसांनी एकूण अडीच क्विंटल शिंगे, अंदाजे २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल, जप्त केला.

जप्त करण्यात आलेल्या शिंगांमधून तीव्र दुर्गंधी येत असल्याने सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण होण्याची तसेच संसर्ग पसरण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. वाहनचालकाकडे या शिंगांच्या वाहतुकीसाठी आवश्यक परवाना नसल्याचे पंचासमक्ष निष्पन्न झाले. पशुधन विकास विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून नमुनेही घेतले आहेत.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम २७१, २८० व २८१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अमडापुर पोलीस करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!