खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील शेगाव रोड परिसरातील ‘फूड स्टोरी’ कॅफेवर पोलिसांनी छापा टाकून संशयास्पद हालचालींवर कारवाई केली. पोलिस निरीक्षक रामकृष्ण पवार यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कॅफेमध्ये शालेय वयातील मुला-मुलींना एकांतासाठी स्वतंत्र कॅबिन्स उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे समोर आले आहे. या कॅबिन्ससाठी प्रति तास सुमारे २०० रुपये आकारले जात असल्याची माहिती आहे. छाप्यादरम्यान कॅफेमध्ये तीन जोडपी आढळून आली. या प्रकारामुळे परिसरात नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, संबंधितांवर कडक कारवाईची मागणी होत आहे.
दरम्यान, ‘ऑपरेशन मिशन परिवर्तन’ अंतर्गत यापूर्वीच संबंधितांना नोटीस देण्यात आली होती. तसेच, शेगाव रोड परिसरात असभ्य वर्तन करताना आढळलेल्या तिघांवर कलम ११० व ११७ अन्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे.
यामध्ये चंद्रकांत संजय बंड (रा. पातूर), हर्ष संजय गवई आणि संतोष नामदेव रहाणे (रा. घाटपुरी) यांचा समावेश आहे. तसेच, गौरव अशोक गावत्रे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून, नियमभंग आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले













